अमरावती - प्रेम विवाह न करण्याची विद्यार्थिनींना शपथ देणाऱ्या प्रचार्य व २ प्राध्यापकांना अमरावतीच्या 'विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी'ने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील टेंभुर्णी येथे महिला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात 13 फेब्रुवारीला प्राध्यापकांनी शपथ दिली होती. यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली होती.
घडल्या प्रकाराची गंभीर दखल संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी घेतली. संस्थेचे सचिव युवराजसिंह चौधरी यांच्या मार्फत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे, प्रदीप दंदे आणि राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी व्ही. डी. कापसे यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींना देण्यात आलेली शपथ ही कायदेसंगत नाही. तशी असंवैधानिक शपथ देताना संस्थेची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. घडल्या प्रकाराबाबत संस्थेला पूर्णत: अनभिज्ञ ठेवण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम पत्रिकेत या कार्यक्रमाचा उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे आपण केलेले कृत्य असंवैधानिक आणि संस्थेची प्रतिमा मलिन करणारे आहे, त्यासाठी आपणाविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये? अशा आशयाचा मजकूर कारणे दाखवा नोटीसमध्ये आहे.
हेही वाचा - प्रेमविवाह न करण्याच्या 'त्या' शपथ प्रकरणावर प्राचार्यासह प्राध्यापकांचा माफीनामा
घडलेल्या प्रकाराबाबत प्राचार्य आणि इतर दोन प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. असंवैधानिक कृत्यांना संस्थेत थारा नाही. समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असे विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे म्हणाले.
हेही वाचा - मी शपथ घेते की.. महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी घेतली कधीही प्रेमविवाह न करण्याची शपथ