अमरावती - जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किट होऊन धुराचे लोळ निघाले. यावेळी कर्तव्यावरील डॉक्टर, परिचारिकांनी धैर्य दाखवीत अतिदक्षता विभागातील बाळांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
आज दुपारी जिल्हा स्त्री रूग्णालयात नवजात शिशू दक्षता विभागात एका इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जोरदार आवाज होऊन धुराचा लोळ निघाला. काही क्षणातच वीज खंडित होऊन अंधार पसरला. अवघ्या काही वेळातच नवजात शिशू दक्षता विभागातील आणखी चार इलेक्ट्रिक सर्किटमध्ये स्फोट होऊन धुराचे लोळ निघाले. यावेळी कर्तव्यावरील डॉक्टर आणि परिचरिकांनी अतिदक्षता विभागातील बालकांना बाहेर काढून सुरक्षीत ठिकाणी हलविले. शॉर्टसर्किट झाला, त्यावेळी अतिदक्षता विभागात इनबॉर्न युनीटमध्ये 9 मुलं आणि 6 मुली तसेच आऊट बॉर्न युनिटमध्ये 7 मुलं आणि 1 मुली असे २२ शिशू होते.
या घटनेनंतर जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रचंड खळबळ उडाली. बाळांच्या मातांनी आक्रोश केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वारे, यांनी तातडीने जिल्हा स्त्री रुग्णालयात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली केल्या. विद्युत विभागाचे अभियंता, कर्मचारी जिल्हा स्त्री रुगणल्यात पोहोचले आणि त्यांनी झालेला बिघाड दुरुस्त केला. अतिदक्षता विभागातील नवजात बाळांना डॉ. पंजाबराव स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले.
आजच्या घटनेमुळे हादरलेल्या परिचरिकांनी आज जी दुरुस्ती झाली, ती थातूरमातूर दुरुस्ती आहे. नवजात शिशू अतिदक्षता विभागातून आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्गही नाही. प्रशासनाने रुग्णालयातील आशा गंभीर समस्यांचे निराकरण केले नाही, तर आम्ही काम बंद आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे.