अमरावती - कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता विभागीय आयुक्तांनी नवीन निर्देश जारी केले आहेत. या निर्देशानुसार अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमध्ये आस्थापने उघडण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांसाठी ही वेळ सकाळी 8 ते दुपारी 3 करण्यात आली आहे.
पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच यापूर्वी अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात शनिवार ते सोमवार अशी ३६ तासांची टाळेबंदी लावण्यात आली आहे. या नियमानुसार रात्री ८ वाजताच दुकाने बंद करण्याचे आदेश होते. परंतु, ते नियम आणखी कडक केले असून आता 5 वाजेपर्यंतच पाचही जिल्ह्यातील दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. हे सर्व नियम १ मार्चपर्यंत लागू असणार आहेत.
विभागीय आयुक्तांनी जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार
ज्या उद्योगांना यापूर्वी परवानगी देण्यात आली होती, ते सर्व उद्योग सुरू राहतील. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये 15 टक्के पेक्षा किंवा 15 व्यक्ती यांपैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व प्रकारची उपहारगृहे आणि हॉटेल्स येथे फक्त पार्सल सुविधा सुरू राहतील. लग्नसमारंभासाठी फक्त पंचवीस व्यक्तींनाच परवानगी देण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या चारचाकी गाडीमध्ये चार लोकांना परवानगी तर तीन चाकी गाडी तीन लोकांना परवानगी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवाशांना परवानगी, आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांसह सुरक्षित अंतर राखणे, निर्जंतुकीकरण करून वाहतुकीकरिता परवानगी राहील. सर्व धार्मिक स्थळे ही एका वेळी दहा व्यक्तीपर्यंत मर्यादित स्वरुपात नागरिकांसाठी सुरू राहतील. ठोक भाजी मंडी सकाळी तीन ते सहा या कालावधीत सुरू राहतील. परंतु, सदर मंडईमध्ये किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश राहील.
संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचार बंदीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक-प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस हे बंद राहतील संपूर्ण. अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण, तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षक गृहे व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील. संपूर्ण विभागात सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे या कालावधीत बंद राहतील.