अमरावती - जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात प्रिती बंड यांना शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी सोमवारी उशिरा जाहीर झाली. मंगळवारी प्रिती पण मुंबईवरून अमरावतीला परतल्या. यावेळी शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून प्रिती बंड यांचे जल्लोषात स्वागत केले.
हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : भाजपकडून पहिली यादी जाहीर; ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना वगळले
सोमवारी दिवसभर बडनेरा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार रवी राणा यांना भाजप आणि शिवसेना युतीचा पाठिंबा जाहीर होणार अशा चर्चांना उधाण आले होते. विशेष म्हणजे प्रिती बंड यांना बडनेरा ऐवजी तिवसा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी याबाबतही मुंबईत बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर येत होती. सायंकाळी मात्र प्रिती बंड यांना शिवसेनेने बडनेरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवार घोषित केल्यावर अमरावतीत शिवसैनिकांनी जल्लोष केला.
मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता प्रिती बंड अमरावतीत पोहोचताच पंचवटी चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे शिवसैनिकांनी स्वागत केले. त्यानंतर रुक्मिणी नगर येथील प्रिती बंड यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांची गर्दी उसळली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रिती बंड म्हणाल्या 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळाली. माझे आराध्य दैवत संजय बंड यांच्या कर्तृत्वामुळेच मला उमेदवारी मिळाली आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघात लढत ही अटीतटीची असली तरी संजय बंड हे नाव चमत्कार करणार. तसेच माझा माझ्या शिवसैनिकांवर पूर्ण विश्वास आहे.' असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, बडेरा मतदार संघातून उमेदवारी मिळाल्याने प्रिती बंड भाऊक झाल्या होत्या. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांनी आपला विजय निश्चित होणार अशा शब्दात त्यांना धीर देऊन 'जय भवानी जय शिवाजी' असा जयघोष केला. यावेळी मुस्लिम समुदायातील अनेक मान्यवरांनी प्रिती बंड यांची भेट घेऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास त्यांना दिला.
हेही वाचा - एकनाथ खडसेंनी एबी फॉर्म नसतानाही भरला उमेदवारी अर्ज? 'हे' आहे कारण