अमरावती - शहरात सध्या कडाक्याची थंडी आहे. अशा कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर कुडकुडत रात्र काढणाऱ्या अनेक बेघर व्यक्तींना अमरावती महापालिकेच्या बडनेरा येथील शहरी निवारा केंद्राचा ( Shelter Center in Amravati ) आधार मिळतो आहे. अपंग, वृद्ध अशा व्यक्तींच्या मागेपुढे कोणीही नाही. त्यांच्यासाठी कायमस्वरूपी आशयाचे केंद्र म्हणूनही आधार शहरी बेघर निवारा केंद्र हेच हक्काचे घर झाले आहे.
कडाक्याच्या थंडीत मोठा आधार -
कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपणाऱ्यांना महापालिकेच्या आधार निवारा केंद्रात रात्र काढण्याची संपूर्ण सुविधा उपलब्ध आहे. याठिकाणी येणाऱ्या गरजूंना ब्लॅंकेट, गादी उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एखादी व्यक्ती रस्त्यावर झोपत असेल अशा व्यक्तींना गस्तीवर असणारे पोलीस आपल्या वाहनात बसून बडनेरा येथील आधार सोडून देत असल्याची माहिती आधार केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
अशी आहे व्यवस्था -
या आधार केंद्रावर महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र कक्ष असून टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. आधार केंद्रावर अतिशय अशी स्वयंपाक खोली असून या ठिकाणी दररोज उत्कृष्ट जेवण तयार केले जाते. केंद्रात आश्रयाला असणाऱ्या व्यक्तींना सकाळी चहा नाश्ता दुपारचे जेवण चहा तसेच सायंकाळी सात वाजता रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
31 जणांनी घेतला कायमस्वरूपी आश्रय -
आधार निवारा केंद्रामध्ये बेघर मानसिक रुग्ण, अंध, मुके, वृद्ध अशा निराधार व्यक्तींना निवाऱ्याची व्यवस्था आहे. याठिकाणी रोज अनेक गरजवंत रात्र काढण्यासाठी येतात. तसेच काहीजण दोन, चार दिवसही या ठिकाणी मुक्काम करतात, असे असताना 31 जण मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी आश्रयाला आहेत. त्यांची संपूर्ण जबाबदारी अमरावती महापालिकेकडे आहे.
अंध फिजिओथेरपिस्टचे आधार केंद्र झाले घर
यवतमाळ जिल्ह्यातून अंदमान येथील एका सेवाभावी संस्थेत काम करण्यासाठी निघाले प्रसंजीत मुनेश्वर हे अंध फिजिओथेरपिस्ट पत्नी आणि लहान बाळासह बडनेरा रेल्वे स्थानकावरून या आधार केंद्रात एका रात्रीसाठी आश्रयाला आले होते. त्यांची संपूर्ण माहिती या आधार केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी जाणून घेतली. ते फिजीओथेरपीस्ट असल्यामुळे त्यांची या केंद्रावरच मदत होईल म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना येथे कायमस्वरूपी राहण्याची विनंती केली. प्रसंजीत मुनेश्वर यांनी सुद्धा याच ठिकाणी राहण्याची इच्छा दर्शविली. आज या केंद्रावरील वृद्ध तसेच गरजूंची ते मदत करतात तसेच फिजिओथेरपिस्ट म्हणून त्यांना केंद्राबाहेर शहरात कुठेही फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करण्यासाठी जाण्यास मुभा देण्यात आली आहे. सध्या कडाक्याची थंडी पडली असून शहरातील निराधार व्यक्तींनी उघड्यावर न झोपता बडनेरा येथील आधार निवारा केंद्र येथे यावे आणि रात्र काढावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.