अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित असलेल्या कोहा जंगलातील एका तलावात ७ वर्षांच्या टी- ३२ वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना उजेडात आली. या घटनेने व्याघ्रप्रकल्पात एकच खळबळ उडाली आहे
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभाग आहे. यातील कोहा या पुनर्वसित गावातील अतिसंरक्षित परिसरात टी-३२ क्रमांकाच्या ७ वर्षीय नर वाघाचे वास्तव्य होते. मात्र, बुधवारी सायंकाळी येथील एका छोटेखानी तलावामध्ये टी-३२ या वाघाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर वनविगाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. गुरुवारी सकाळी मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, ते संशोधन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, असे वनाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण आवारे आणि इतर वनाअधिकारी-कर्मचारी तसेच डॉक्टरांचे पथक जंगलात गेले असल्यामुळे या वाघाच्या मृत्यूसंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही.
विष प्रयोगाची शक्यता?
हा वाघ पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र, वाघ पाण्यात बुडू शकत नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे खरे कारण नेमके काय? हे समोर येणे गरजेचे आहे. सध्या तरी विषप्रयोगाने वाघाची शिकार करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच काही विषारी पदार्थ खाल्ल्यानंतर वाघ पाणी पिण्यासाठी गेला असावा आणि तेथे त्याचा बुडून मृत्यू झाला असावा, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.