अमरावती - अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, जबलपूर येथील राणी दुर्गावती यांचे पुतळे आपण पाहत असतो. तेव्हा, इतके रेखीव पुतळे कोणी तयार केले असतील? असा प्रश्न आपल्याला पडतो, तर हे पुतळे तयार करणारे अमरावतीमधील सातारकर कुटुंब आहे. कलाविश्वात योगदान देणारी आता सातारकर कुटुंबाची तिसरी पिढी महामानवांचे शिल्प घडवत आहे. त्यांनी घडविलेल्या कलाकृती आज साता समुद्रापार पोहोचलेल्या आहेत.
नागपूर विमानतळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे शिल्पकार -
अमरावतीच्या रुक्मिणी नगर परिसरात राहणारे साहेबराव सातारकर हे कला क्षेत्रातील मोठं नाव आहे. कोणत्याही व्यक्तीचे, कलाकृतीचे हुबेहूब शिल्प घडविणारी ही व्यक्ती आहे. नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा नजरेत भरतो, त्या पुतळ्याचे शिल्पकार साहेबराव सातारकर आहेत. अमरावतीच्या तपोवन परिसरात उद्यानात असणारा शिवाजीराव पटवर्धन यांचा पुतळा त्यांनीच घडविला.
अमेरिकेसह दक्षिण आफ्रिकेतही साहेबरावांनी तयार केलेले पुतळे -
अमेरिकेच्या लॉस एंजेलीस शहरात मोहेंजोदडो येथील नर्तकीच्या शिल्पासारखे हुबेहूब कांस्य धातूचे 7 फुटाचे शिल्प जिथे कुठे दिसेल, ते शिल्प अमरावतीच्या साहेबराव सातारकर यांच्या हाताने घडविले याचा उल्लेख दिसेल. नर्तकीच्या शिल्पासह लॉस-एंजेलीस शहरात कांस्य धातूचा 4 फुटांचा मोर, कुत्रा आणि मुलीसोबत असणाऱ्या तीन फुटांच्या शिल्पाला आकार देणारेही साहेबराव सातारकर आहेत. दक्षिण आफ्रिकेत गांधी विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या फिनिक्स संस्थेने महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांचे शिल्प हे साहेबराव सातारकर यांच्या हातूनच घडवून घेतले आहे.
जबलपूरमधील राणी दुर्गावतींचा साडेआठ फुटांचा पुतळा -
वर्धा महापालिकेसाठी इंदिरा गांधी यांचा 9 फुटांचा पुतळा, नागपूर शहरात देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा पुतळा, देवळी नगरपलिकेसाठी 6 फुटांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, हिवरखरखेड येथे 6 फुटांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा, अमरावती महापालिकेच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन प्रांगणात 71.2 फुटांचा संत गाडगेबाबांचा पुतळा, पंढरपूर येथे संत गजानन महाराजांचे 6 फुटांचे मार्बलचे शिल्प, दर्यापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 16 फुटांचा पुतळा, मध्यप्रदेशातील जबलपूर येथे राणी दुर्गावती यांचा साडेआठ फुटांचा पुतळा आणि त्यांचा मुलगा वीर नारायणचा 6 फुटांचा पुतळा, गोंदिया शहरात मनोहरभाई पटेल यांचा साडेअकरा फुटांचा पुतळा, बीड शहरातील शिवमंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 10 फुटांचा पुतळा, मध्यप्रदेशातील शिवणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, अशा अनेक ठिकाणी विविध पुतळ्यांची निर्मिती साहेबराव सातारकर यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रापासून झाली सुरुवात -
अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यात आणि आता तेल्हारा तालुक्यात असणारे दापोरा हे साहेबरावांचे मूळ गाव आहे. त्यांनी चौथ्या वर्गात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र काढले. त्यात घरातील कुंकू, शाईचा वापर करून रंग भरला. त्याचदिवशी घरी तुळशीराम पाटील नावाचे गृहस्थ आले होते. साहेबराव यांनी काढलेले चित्र पाहून, या पोराला खामगावच्या फंदे गुरुजींकडे पाठवा, असे पाटील यांनी घरच्यांना सांगितले. त्यावेळी पहिल्यांदा कलेचे शिक्षण असते, हे साहेबरांना समजले. दहावीनंतर पुढची पाच वर्ष खामगाव येथील कलाचार्य फंदे गुरुजी चित्र, शिल्प महाविद्यालयात शिक्षण घेतले. शिकत असताना सुलभा नावाची मैत्रीण मिळाली आणि तिच्याशी साहेबारावांचे पुढे लग्न झाले.
रुरल महाविद्यालयात बरेच वर्ष शिल्प निर्मितीचं काम -
शिक्षणानंतर साहेबराव अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातून माधान आश्रमात आले. याठिकाणी 12 वर्ष महात्मा गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शताब्दीवर्षानिमित्त त्यांचे शिल्प घडविली. त्यानंतर साहेबाराव सातारकर अमरावतीला आले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेने त्यावेळी भरभरून मदत केली. त्यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख हयात नव्हते. मात्र, त्यांच्या पत्नी विमलाबाई देशमुख आणि मुलगा अनंत आणि भाचे बी. आर. देशमुख यांनी संस्थेच्या रुरल महाविद्यालयात शिल्पकलाकृतीसाठी एक दालनच उपलब्ध करून दिले. बरीच वर्ष रुरल महाविद्यालयात शिल्प निर्मितीची कामे केल्यावर हे काम आता रुक्मिणी नगर येथील घराच्या आवारात तसेच शहरापासून काही अंतरावर घेतलेल्या शेतात सुरू असल्याचे साहेबराव सातारकर यांनी सांगितले.
मुलासह नातूही कलाक्षेत्रातच -
शिल्पकलेच्या कामात त्यांना पत्नी सुलभाची मोठी साथ मिळाली. मात्र, आता पत्नीचे निधन झाले. लहान मुलगा विश्वजितने मुंबईच्या जे. जे. कॉलेज ऑफ आर्टस् मधून शिक्षण पूर्ण केले. अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा त्याने निर्माण केला. तो वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे उभारण्यात आला आहे. साहेबराव सातारकर यांचा नातू आर्य सातारकर हा आजी, आजोबा जिथे शिकले त्या खामगाव शहरातील कलाचार्य फंदे गुरुजी चित्र, शिल्प महाविद्यालयात अंतिम वर्षाला आहे. सध्या लॉकडाऊमध्ये घरी असणाऱ्या आर्यने महात्मा गांधी यांचा पुतळा घडविला आहे. सातारकर यांच्या 'शिल्पज' या घराच्या अंगणात महादेवाच्या सुंदर शिल्पासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांची शिल्प लक्ष वेधून घेतात.