अमरावती - नागपूर ते मुंबई केवळ ८ तासात अंतर पार करता येईल, असा मोठा समृद्धी महामार्ग तयार होतो आहे. सद्या या रस्त्याचे विदर्भातील काम अंतिम टप्यात आहे. उर्वरित काम कंत्राटदार झपाट्याने पूर्ण करीत असताना काल रात्री जिल्ह्यातील सावळा रोड जवळचा पूल अचानक खचला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सद्या खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम या ठिकाणी सुरू आहे. मात्र, शीघ्रगतीने कामकाज करण्याच्या नादात कंत्राटदार बोगस काम करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
१२ जिल्ह्यातून जाणारा महामार्ग -
हा समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. नागपुर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. अप्रत्यक्षपणे काही जिल्हे चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही जलद वाहतुकीचा फायदा होणार आहे. जवळपास २६ तालुके व ३९२ गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावतीला येऊन समृद्धीमाहामार्गाची पाहणी केली होती. यावेळी नागपूर ते शिर्डी महामार्ग १ मेपासून सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले होते.
हेही वाचा - दिल्लीत शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली, २६ जानेवारीसाठी रंगीत तालीम