अमरावती - युद्ध होणार नाही असच वाटत होता. मी राहत असलेल्या चर्निवीत्सी शहरात युद्धाचे वातावरण नव्हते मात्र कीव आणि खारकिव या दोन शहरांवर बॉम्बचा वर्षाव व्हायला लागला. (Indian Students Ukraine shared experiences) त्या शहरातील माझ्या मित्रांनी होईल तितक्या लवकर भारतात परत जाण्याची तयारी कर असे भ्रमणध्वनीद्वारे सांगितले. भारतीय दूतावासापासून मला लगेच कॉल आला आणि अवघ्या तीस मिनिटात रस्त्याने पळता येईल इतकेच साहित्य घेऊन बॅग भरा आणि घरातून निघा असे सांगण्यात आले. जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील रहिवासी असणारा साहीर तेलंग युद्ध भूमीतून आपल्या घरी सुखरूप परतला. त्याचा युक्रेन ते मायदेशी पर्यंतचा प्रवास त्याला आलेले अनुभव आणि सध्या त्याच्या मित्रांची अवस्था याबाबत त्याने' ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.
दहा तास चालली पडताळणी
चर्निवीत्सी येथून माझ्यासह अनेक भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी बसद्वारे रोमानिया सीमेवर आणले. या ठिकाणी व्हिजा पासपोर्ट यासंदर्भात जवळपास दहा तासांपर्यंत पडताळणीची प्रक्रिया चालली. माझ्यासह सीनियर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक-दोन वर्षांपूर्वीच युक्रेनमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. आमच्या मदतीने सर्व ज्युनियर विद्यार्थ्यांची पडताळणी करण्यात आली. यानंतर आम्हाला रोमानियाच्या बूडापोस्ट विमानतळावर नेण्यात आले. 24 फेब्रुवारीला बुडापोस्ट विमानतळावरून आम्ही मुंबईच्या दिशेने झेप घेतली आणि सहा तासात मुंबईला पोहोचलो तिथून नागपूरला आलो आणि आता थेट घरी पोहोचलो असे साहीर म्हणाला.
युक्रेनियन नागरिकांनी केली मदत
युक्रेनियन नागरिकांची मदत मला सातत्याने मिळाली. गत सहा वर्षांपासून माझे अनेक युक्रेनियन मित्र झालेत. अनेक युक्रेनियन कुटुंबन्शीही माझा संबंध आला. युद्ध सुरू झाले त्यावेळी आमच्या शहरातील सर्व एटीएम मधील पैसे संपले होते . अनेक ठिकाणी एटीएम बाहेर शेकडो लोकांच्या रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीत युक्रेनियन मित्रांनी माझ्यासह अनेक भारतीयांना धीर देण्याचे काम केले. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस घाबरू नको आम्ही तुला आमच्या घरी सुरक्षित ठेवू असे युक्रेनियन मित्र मला म्हणायचे. युद्ध सुरू झाल्यावर मला मायदेशी परत येण्यासाठी सुद्धा युक्रेनियन नागरिकांची मदत मिळाली. सध्या युक्रेनियन नागरिकांबाबत उलट सुलट बातम्या येत आहेत. मात्र केवळ भाषा समजत नसल्यामुळे तिथे वाद होत असल्याचे साहीरने सांगितले.
नवीन च्या मृत्यूमुळे बसला धक्का
मूळचा कर्नाटकातील रहिवासी असणारा नवीन या विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मला धक्का बसला. नवीनला मी ओळखत नाही मात्र नवीन ज्या महाविद्यालयात होता या महाविद्यालयातील काही विद्यार्थी माझे मित्र आहेत. आजही युक्रेन मध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. तिथली परिस्थिती सध्या गंभीर आहे. मात्र आता युरोपीय देशांच्या मध्यस्थीने युक्रेन आणि रशियामध्ये चर्चेद्वारे वाद संपुष्टात येईल अशी अपेक्षा असल्याचे साहीर म्हणाला.
कुटुंबाशी होतास संपर्क
खरं तर आजच्या युगात युद्ध होणार नाही असेच वाटत होते. मात्र युक्रेनची राजधानी किव आणि त्यासोबतच खारकिव या शहरांवर बॉम्ब हल्ले सुरू झाले आणि माझ्यासह शेकडो भारतीय विद्यार्थी हादरले. माझा माझ्या आई-वडिलांशी रोजच संपर्क होत असल्यामुळे मी त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली होती. भारतीय दूतावासाने मायदेशी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या यादीत माझे नाव सामील केले होते. आमच्या शहरात युद्धजन्य परिस्थिती नव्हती. यामुळे आम्ही सुखरूप निघून आलो.
अभ्यासक्रम पूर्ण होणार, पदवीही मिळेल
युद्ध सुरू असले तरी आमच्या शिक्षणात कुठलाही अडथळा येणार नाही. आमच्या चर्निवीत्सी विद्यापीठाने तसे आम्हाला सांगितले आहे. परिस्थिती कितीही गंभीर झाली तरी युरोपीय संघाच्या मदतीने आमचा अभ्यासक्रम पूर्ण करून आमची रीतसर परीक्षा घेतली जाणार आहे. एक दोन महिन्यात युक्रेन आणि रशियामधील वाद शांत होईल अशी मला शाश्वती असून युक्रेनमध्ये शिकणाऱ्या माझ्यासह इतर सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अजिबात होणार नाही अशी मला खात्री असल्याचा विश्वास साहीर तेलंग यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - School Starts In Mumbai : हुश्श..उघडल एकदाच ज्ञानमंदिर! आजपासून मुंबईत शाळा सुरू