अमरावती - नियोजित तारखेला ग्रामसभा आयोजित करण्यात न आल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये गोंधळ घातला. तेव्हा रोजगार सेवकाने भर ग्रामसभेत जमलेल्या गावकऱ्यांना कुऱहाड दाखवत शिवीगाळ केली. ही घटना दर्यापूर तालुक्यातील वडाळ गव्हाण या गावात घडली. या प्रकरणी राहिमपूर पोलिसांत रोजगार सेवकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दर्यापूर तालुक्यातील वडाळ गव्हाण येथील रोजगार सेवक प्रभूदास इंगळे यांनी महात्मा गांधी रोजगार हमीच्या कामात बोगस मजूर दाखवून घोटाळा केल्याची तक्रार गावातील नागरिक संजय इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली. कामावर नसतानासुद्धा काही लोकांना कामावर दाखवून पैसे उकळण्याचा गैरप्रकार सुरू असून त्या अनुषंगाने ग्रामसभा घेऊन दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सरपंच मंदा इंगळे आणि सचिव रायबोले यांच्याकडे केली. तेव्हा आपण यावर ग्रामसभेत चर्चा करु, असे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिले होते.
त्यानंतर नियोजित तारखेला सचिवांनी ग्रामसभा आयोजित केली नाही. नंतर त्यांनी ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेत संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायत येथे गोळा होऊन घोटाळ्याविषयी त्यांना जाब विचारत असताना, रोजगार सेवक इंगळे याने कुऱ्हाड आणून उपस्थित गावकऱ्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. या प्रकरणी गावकऱ्यांनी रोजगार सेवकाविरोधात राहिमपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. रोजगार सेवकाने भ्रष्टाचार करुनही ग्रामपंचायत सचिव रोजगार सेवकाला पाठिशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.