अमरावती - जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील प्रसिद्ध गुरुदासबाबा मंदिरात तलवारधारी दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत गुरुदास महाराजांना मारहाण केली. तसेच यावेळी दीड लाखाच्या रोकडसह ४ सोन्याच्या अंगठ्या चोरट्यांनी लंपास केल्या. ही घटना रविवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्डी येथे गुरुदास महाराज यांचे प्रसिद्ध मठ आहे. याठिकाणी दर गुरुवारी व रविवारी सत्संग भरतो. त्यामुळे जिल्हाभरातील भाविक याठिकाणी महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र, रविवारी रात्री याठिकाणी मंदिरात प्रार्थना सुरू असताना चारचाकी वाहनातून ७ ते ८ दरोडेखोरांनी प्रवेश करत सुनील उर्फ गुरुदास जानराव कावलकर (वय ४१, रा.मार्डी) या महाराजांना जबर मारहाण केली.
तलवार घेऊन आलेल्या दरोडेखोरांनी महाराजांच्या डोक्यावर पाण्याने भरलेला माठ फोडला. त्यानंतर महाराजांच्या खोलीत प्रवेश करत कपाटातील दीड लाखांची रोकड, ४ सोन्याच्या अंगठ्या असे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात महाराज किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी घटनास्थळी काही महिला भक्त उपस्थित होते.
माहिती कुऱ्हा पोलिसांना मिळताच कुऱ्हा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिव जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता याठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन, जिल्हा पोलीस उपअधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह कुऱ्हा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी रात्रीच जिल्हाभरात नाकाबंदी करून दरोडेखोरांचा शोध घेतला. मात्र, यात कोणीच सापडले नाही. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३९५ (३४) नुसार गुन्हा दाखल केला आहे.