अमरावती - मागील आठवड्यात कडाक्याची थंडी पडल्याने तूर पिकाला या थंडीचा फटका बसला होता. तर आता ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने विदर्भात तापमानात 10 ते 12 डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे वातावरण संत्रा उत्पादन शेतकऱ्यांसाठी पोषक असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत आहे वारे
मागील काही दिवसांपासून उत्तरेतील वातावरणाच्या बदलामुळे थंडीची लाट आली आहे. त्यात वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत असल्याने थंडी आहे. ही लाट मध्यप्रदेशमध्ये आल्याने तेथेही थंडीची लाट आहे. त्यातच या वाऱ्याने विदर्भात प्रवेश केल्याने विदर्भातदेखील थंडी होती. आता दोन जानेवारी ते पाच जानेवारीदरम्यान मध्य भारतात ढगाळ वातवरण व पावसाची शक्यता असल्याने थंडीचे प्रमाण कमी होऊन उष्णता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातसुद्धा उष्णतामान वाढत असल्याने हे वातावरण संत्राबहार येण्यासाठी पोषक असल्याचे मत, कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.