अमरावती - आधी दुबार पेरणीचे संकट आले. त्यात आता हातातोंडाशी आलेले सोयाबीन खोडकिडीने तसेच नंतर आलेल्या परतीच्या पावसाने खराब झाले. यामुळे काढायलाही न परवडणाऱ्या सोयाबीनवर हताश झालेल्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरच फिरवला. राजू सांभारे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
तिवसा तालुक्यातील मालधुर येथील राजू सांभारे या शेतकऱ्याकडे एकूण दहा एकर शेती आहे. त्यातील पाच एकर शेतीवर त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. मात्र, बोगस बियाण्यांमुळे ते उगवले नाही. त्यानंतर त्यांनी दुबार पेरणी केली. पीक जोमात होते. मात्र, ऐन काढणीच्या वेळेला खोडकीड आणि परतीचा पाऊस आल्याने हातातोंडाशी आलेले पीक खराब झाले.
हेही वाचा - मुलाचे तोंड पाहण्याआधीच आलं वीरमरण, जवान सूरज लामजे अपघातात हुतात्मा
त्यामुळे सोयाबीन पीक होणार नसल्याने संतापाच्या भरात या शेतकऱ्याने आपल्या पाच एकर सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला आणि पीक मोडून टाकले.
काय म्हणाले राजू सांभारे? माझी साडेदहा एकर शेती आहे. त्यात मी पाच एकर सोयाबीनची पेरणी केली. सुरूवातीला पीक चांगले होते. मात्र, नंतर आलेल्या पावसामुळे सर्व पिकाचे नुकसान झाले. माझा खर्चही जवळपास एक लाख 35 हजार झाला. आज जे ट्रॅक्टर आणले. तेसुद्धा माझे नसून भाड्याने आणलेले आहे. |