अमरावती - शेती करणे हा सद्यस्थितीत घाट्याचा व्यवसाय झाला आहे. पण, अमरावतीतील एका निवृत्त प्राचार्याने यशस्वी शेतीचा प्रयोग करुन दाखवला आहे. अमरावती जिल्ह्यातील वऱहा येथील अर्जून गांजरे यांनी त्यांच्या शेतात निंबोणी आणि सीताफळाची बाग त्यांच्या शेतात फुलवली आहे.
अर्जून गांजरे हे वऱ्हा येथील रहिवासी आहेत. सेवानिवृत्त प्राचार्य असणाऱ्या गांजरेंना आधीपासूनच शेतीची आवड आहे. नोकरीमुळे त्यांना शेती करता आली नाही. पण, निवृत्तीनंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. आपल्या शेतात प्रयोग करुन एका यशस्वी शेतीचे उदाहरण इतरांसमोर ठेवले आहे.
गांजरे यांची वऱ्हा येथे ५ एकर शेती आहे. अडीच एकरात त्यांनी ५०० निंबोणीच्या थायलंड सीडलेस जातीची आणि ५०० सीताफळाची झाडे लावली. अवघ्या दीड वर्षातच निंबोणीच्या झाडाला मोठ्या प्रमाणात फळे लागली. पुढल्या वर्षी सीताफळांना फळे येतील असे गांजरे म्हणाले.
या झाडांचे कलम गांजरे यांनी नाशिकहून आणले होते. रासायनिक खतासोबतच त्यांनी सेंद्रीय खताचाही वापर केला. प्रत्येक झाडाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा केला. योग्य काळजी घेतल्याने पीकांचा चांगली वाढ झाली. निंबोणीच्या एका झाडाला दीडशेहून अधिक लिंब पहायला मिळतात. गांजरे यांना या शेतीतून वर्षाला दीड लाख रुपयांचा नफा मिळतो.