अमरावती - राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची ही साखळी तोडायची असल्यास कोरोनाचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृती राज्य शासनाकडून व सामाजिक संस्थांकडून वारंवार केली जात आहे. मागील एक वर्षापासून पोलीस देखील या कोरोना काळात आपले कर्तव्य बजावत असतानाच उरी हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहणारे अमरावतीमधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आता शासनाच्या मदतीला धावून आले आहेत.
माधव कोरगावकर असे या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते आपल्या बुलेटवरून कोरोना नियमांची दररोज जनजागृती करत आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या बुलेटवर प्रथम दर्शनी एक फलकदेखील लावला आहे. या फलकावर कृपा करा दोन गज अंतर, मास्क हेच मंतर.. प्रशासनाला साथ द्या, कोरोनावर मात करा, असा संदेश ते अमरावतीमधील लोकांना देत आहेत. अमरावतीच्या अर्जुननगर परिसरात राहणारे माधव कोरेगावकर हे एक सामाजिक संस्था देखील चालवत आहेत.
प्रशासनात पोलीस निरीक्षण म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस खात्यात काम करत असताना सामाजिक भावनेतून त्यांनी अनेक उपक्रम राबवले, त्यामुळे सेवा निवृत्तीनंतरही त्यांचे सामाजिक कार्य हे सुरूच आहे. त्यामुळे कोरोना काळात देखील ते आता शासनासोबत खंबीरपणे उभे असून ते कोरोना नियमांची जनजागृती करत आहेत. त्यांनी बुलेट वर लावलेले फलक हे अमरावती शहरातील लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे.
म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहले होते पत्र
काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी उरी येथे हल्ला केला होता, या हल्ल्यात भारताचे २० जवान हुतात्मा झाले. त्यावेळी कोरेगावकर यांनी मोदीजी मला सीमेवर पाठवा, अशा आशयाच फलक आपल्या बुलेटवर लावला होता. तसेच मला सीमेवर पाठवा अशी मागणी पत्र लिहून पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोरेगावकर यांनी केली होती.
आत्मचेतना सन्मान फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत
माधव कोरेगावकर हे 2014 मध्ये पोलीस निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी आत्मचेतना सन्मान फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना मदतकार्य सुरू केले. त्यांची ही सामाजिक संस्था नेहमीच गोरगरीब लोकांना व विद्यार्थ्यांना मदत करत राहते. त्यामुळे आताही कोरोना काळात ते जनजागृती करत आहेत.
लोकांचा मिळतोय चांगला प्रतिसाद
कोरेगावकर हे दररोज अमरावतीमध्ये आपल्या बुलेटने सवारी करतात. बुलेटच्या प्रथम दर्शनीच कोरोना नियमांचे पालन करा, असा फलक लावला आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्या फलकावर पडते, यावेळेस कोरोना विषयीची जनजागृतीही कोरेगावकर करतात. तसेच लोकांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.