अमरावती- एका सेवानिवृत्त ग्रामसेवकाचा ट्रक अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जिल्ह्यातील मोर्शी नेरपिंगळाई येथून जाणाऱ्या तिवसा चांदुरबाजार राज्य महामार्गावरील लेंडी नदीच्या बाजूला घडली. सुधाकर देशमुख (वय.८८ रा.नेरपिंगळाई) असे मृत्यू झालेल्या निवृत्त ग्रामसेवकाचे नाव आहे.
नेरपिंगळाई येथील तिवसा चांदूरबाजार मुख्य रस्त्यावरून ट्रक क्र. (एम.पी. ४६ एच. ०३६१) हा सोयाबीन बियाणे घेऊन वरोऱ्याकडे जात होता. दरम्यान, सेवा निवृत्त ग्रामसेवक सुधाकर गुलाबराव हे नेरपिंगळाई गावाकडे जात होते. यावेळी ट्रक चालक रवींद्र चौहान (वय.२४ रा. देशगाव ता. छेगाव माखन जि. खंडवा) याने बेजबाबदारपणे वाहन चालवत सुधाकर गुलाबराव देशमुख यांच्या गाडीला कट मारला. त्यामुळे, देशमुख यांच्या गाडीचा तोल गेला. त्यांनी गाडीचा तोल सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा- अमरावतीत कोरोनाबाधितांचा आकडा 84 वर...