अमरावती - शेगाव-रहातगाव मार्गावर असणाऱ्या ओम कॉलनीकडे महानगरपालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाने दुर्लक्ष केले आहे. येथील नाल्यांची सफाई रखडली असून सर्वत्र गवताचे साम्राज्य पसरले आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी नगरसेवकांसह महापालिका प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
शेगाव नाका परिसरात असणारी ओम कॉलनी हा सुशिक्षित आणि उच्चभ्रू लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या कॉलनीत सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. अर्ध्यापेक्षा जास्त नाली झुडपांनी वेढली असल्यामुळे नालीची सफाई करण्यास सफाई कामगारही टाळाटाळ करतात.
कॉलनीतील मुख्य मार्गावरही गवत आणि झुडपे वाढल्यामुळे मुख्य मार्गावरून वाहने चालवणेही कठीण झाले आहे. दिवाळीपूर्वी महानगरपालिका प्रशासन या परिसरात सफाई करेल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र, अद्यापही महापालिका प्रशासनाने ओम कॉलनी परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न सोडवलेला नाही.
हेही वाचा - माहेरी आलेल्या महिलेचा टाकीत बुडून मृत्यू
वाढलेल्यामुळे गवतामुळे अनेक घरांमध्ये साप निघत आहे. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रभागात एकूण चार नगरसेवक आहेत. चारही नगरसेवकांसमोर नागरिकांनी परिसरातील समस्यांचा पाढा वारंवार वाचला आहे. मात्र, संबधितांकडून दखल घेतली जात नाही.
दरम्यान, काही महिलांनी पुढाकार घेऊन कॉलनीतील खेळाच्या मैदानाची साफई केली. प्रभागातील एकही नगरसेवक आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आता महापालिका आयुक्तांकडे मोर्चा नेणार असल्याचे ओम कॉलनीतील रहिवाशांनी सांगितले.