अमरावती - शहरालगत असणाऱ्या वडाळी-पोहरा जंगलात बिबट्यांची दहशत वाढली आहे. राज्य राखीव पोलीस दल वसाहतीतील एका घरातून बिबट्याने कुत्र्याला नेल्याची घटना सोमवारी रात्री घडली. त्यानंतर मंगळवारी लगतच्या वैष्णवदेवी मंदिर पारिसरात एका म्हशींच्या गोठ्यात असणाऱ्या कुत्र्याची शिकार केली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वडाळी, पोहरा, भानखेडा, मोगरा या एकमेकांना लागून असणाऱ्या जंगलात १० ते १२ बिबट्यांचा वावर आहे. या परिसरात घनदाट जंगल आहे. त्यामुळे हा परिसर बिबट्यांच्या वास्तवासाठी सुरक्षित आहे. या जंगलालगतच राज्य राखीव पोलीस दल कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या वसाहतीमध्ये राहणारे पोलीस निरीक्षक मारोती नेवारे यांच्या बंगल्याच्या आवारात रविवारी मध्यरात्री बिबट शिरले. त्याने घराच्यासमोर बांधून असलेले लेब्राडॉर जातीचे कुत्र बंगल्याच्या मागच्या बाजूने घासत नेऊन त्याची शिकार केली. सोमवारी सकाळी नेवारे कुटुंब जागे झाले. त्यावेळी त्यांना दारात रक्त पडलेले दिसले. त्यानंतर नेवारे यांनी कुत्र्याचा शोध घेतला असता कुत्र्याला बिबट्याने घासत घराच्या मागे नेले असल्याचे आढळून आले. घराच्या मागे जाऊन पाहिल्यावर कुत्रा मृतावस्थेत आढळून आला. त्याचे अनेक ठिकाणी लचके तोडले असल्याचेही आढळून आले. नेवारे यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिल्यावर सायंकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून कुत्र्याचा मृतदेह विच्छेदनासाठी नेला.
दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजता पुन्हा बिबट्या नेवारे यांच्या घरामागे आला. बिबट्या येताच परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी बिबट्या परिसरातून निघून गेला.
राज्य राखीव दल वसाहतीपासून काही अंतरावर असलेल्या वैष्णवदेवी मंदिर पारिसर आहे. बिबट्याने येथील अहमद फिरोज मोहमद हमीद यांच्या म्हशीच्या गोठ्यात असलेल्या कुत्र्याची शिकार केली. यावेळी इतर कुत्रे जोरात भुंकायला लागल्याने बिबट्या आला की, काय या शंकेने श्रीपाद खोरगडे, अहमद फिरोज मोहमद हमीद यांनी गोठ्याच्या मागे जाऊन पाहिले. त्यावेळी बिबट्या कुत्र्याला घेऊन जात असल्याचे त्यांना दिसले. या परिसरात बिबट्याचा वावर नित्याची बाब बनलेली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील रहिवासी करीत आहेत.