अमरावती - विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी - वरुड तालुका हा संत्र्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागातील अनेक शेतकरी हजारो हेक्टर जमिनीवर संत्र्याचे उत्पादन घेतात. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र भुयार यांनी संत्रा बागांची पाहणी केली.
हेही वाचा - भाऊबीजेसाठी बहिण पाहत होती भावाची वाट; मात्र मिळाली त्याच्या हत्येची बातमी
संत्र्यांचे उत्पादन जास्त असले तरी, या फळावरील रोगांवर कोणत्या उपाययोजना करायच्या या प्रश्नाबाबत शेतकरी अजूनही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे हे उत्पादन धोक्यात आले असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहे. या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मार्गदर्शन मिळावे अशी मागणी आ. भुयार यांनी कृषी विभागाकडे केली.
शासनाच्या व कृषी संशोधकांच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन वेळेवर मिळत नसल्यामुळे हे संकट उभे राहिल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संत्र्यावर सध्या शेंडेमर, संत्रा गळती, पानगळ, यांसारख्या अनेक रोगांची लागण झाल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. गारपीट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अज्ञात रोगाची लागण, संत्र्याला अत्यल्प भाव, संत्रा गळती, अशा दृष्ट्चक्रात संत्री उत्पादक शेतकरी भरडला जात आहे.