अमरावती - दर्यापूर तालुक्यातील गेल्या कित्येक वर्षांपासून वडाळ गव्हाण ते कुंभारगावला जोडणारा रस्ता पक्का करावा, अशी मागणी येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र, प्रत्येक वेळीस आश्वासन देऊन प्रशासन व लोकप्रतिनिधी वेळ मारून नेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना या रस्त्यावरुन चालवून दाखवा आणि एक लाखांचे बक्षीस मिळवा अशी ऑफरच दिली आहे.
हेही वाचा - पाकिस्तानविरूद्ध लष्करी कारवाई करण्यास मनमोहन सिंग होते सज्ज - कॅमरून
ग्रामीण भागातील रस्त्याची लागलेली वाट ही नवीन गोष्ट नाही. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे. एवढेच नाही तर कच्चे रस्ते तर पूर्ण चिखलात माखले असतात. दर्यापूर तालुक्यातील गव्हाण ते कुंभारगाव रस्त्यात असाच प्रकार सुरू आहे. त्यामुळे आपला जीव धोक्यात टाकून ग्रामस्थांना प्रवास करावा लागतो. त्यात रस्ते चिखलात बुडल्याने वाहन चिखलात फसत असल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा - बेस्ट वर्कर्स युनियन आणि कृती समितीने पुन्हा उगारले संपाचे हत्यार
या रस्त्यावरील शेतीतील माल आणणे तसेच इतर वाहतूक जीव मुठीत घेऊन करावी लागत असल्याने नागरिकांत असंतोष पसरत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
हेही वाचा - भारतात आर्थिक आरिष्ठ नाही, प्रकाश जावडेकर यांचा दावा
या रस्त्याचे दोनवेळा भूमिपूजन सुद्धा करण्यात आले, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, रस्ता मात्र झाला नाही. त्यामुळे नुकतीच ट्रॅक्टरची ट्रॉली या रस्त्यावर उलटली, सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. मात्र, अशीच परिस्थिती राहिल्यास अपघाताची घटना घडू शकते. त्यामुळे या रस्त्याचे बांधकाम होणे अत्यंत गरजेचे आहे.