अमरावती - येत्या 23 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. मात्र आता कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, शाळा सुरू करणे धोक्याचे ठरू शकते. असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी परिस्थिती वेगळी होती, कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली होती. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, हे प्रमाण असेच राहिले तर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार केला जाईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
शिक्षणापेक्षा आरोग्य महत्वाचे
येत्या काळात कोरोनाचे रुग्ण वाढले तर, शाळा सुरू ठेवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा लागेल. कारण शिक्षणापेक्षा आरोग्य महत्त्वाचे आहे, असेही बच्चू कडू यांनी यावेळी म्हटले. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार असून, त्याचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यात आले आहे. वर्ग सॅनिटाईझ करण्यात येणार आहेत, तसेच मास्क लावणे व विद्यार्थ्यांची तपासणी करणे अशा सर्व गोष्टींचे नियोजन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - ..अखेर आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
हेही वाचा - वीज बिलाचा 'शॉक'.. महिन्याला हजार रुपयांच्या कमाईत पोट भरावं की तुमचं बिल, बडनेरातील गोदाबाईंचा सरकारला सवाल