अमरावती - भातकुली तालुक्यातील सायात या गावाजवळ मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैसे,सहाय्यता कार्ड आणि फराळाचे साहित्य घेऊन युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आले होते. यावेळी आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर ग्रामस्थांनी हल्ला चढवला. या घटनेमुळे बडनेरा विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे.
अपक्ष उमेदवार आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांचे वाहन फिरत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. सायत येथील ग्रामस्थांनी गाडी गावाजवळ येताच ती अडवून गाडीची झडती घेतली. यावेळी गाडीमध्ये मोठ्या संख्येने कुपन आढळून आले. या कुपनवर स्वाभिमान सहाय्यता कार्ड असा उल्लेख असून 'दीपोत्सव आनंदाचा...गोर गरिबांचा कैवारी आमदार रवी राणातर्फे मोफत किराणा वाटप', असा उल्लेख असून रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या छायाचित्रांसह रवी राणा यांचे निवडणूक चिन्ह टीव्ही सुद्धा या कार्डवर अंकित आहे.
कार्डसोबत दिवाळीचा फराळ, बिस्कीटचे पुडे आणि काही रोख रक्कमही आढळून आली आहे.
हेही वाचा - पाटलांपेक्षा देशमुख श्रेष्ठ; अमरावतीमध्ये व्हायरल पत्रकामुळे वाद उफाळला
ग्रामस्थांनी कारवर हल्ला चढवताच गाडीमध्ये असणाऱ्या दोघाजणांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, माहिती मिळताच भातकुली पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून या प्रकारणाची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती या प्रकारणाची सत्यता समोर येईल.