अमरावती: झाडांपासून सावली व फळे मिळत असल्याचे सर्वांनाच माहित आहे. मात्र, अमरावतीमधील दहिपळस हे झाड वैद्यकीयदृष्ट्या अंत्यत उपयुक्त आहे. त्या झाडापासून मिळणारे फायदे पाहता त्याचा औषधांच्या निर्मितीत देखील वापर होतो. चला, तर या झाडाचे फायदे जाणून घेऊ.
दहिपळस या झाडाला दहीमन या नावानेही ओळ्क्ले जाते. कॉर्डिया मैकलियोडी असे असे या झाडाचे बॉटनिकल नाव असल्याची माहिती डॉ. प्रवीण सरदार ( वनस्पती शास्त्र विभाग छत्रपती शाहू महाविद्यालय चांदुर रेल्वे) यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. ज्या व्यक्तीला विषबाधा झाली त्या व्यक्तीच्या शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी या झाडाच्या मुळांचा उपयोग केला जातो. छत्तीसगडमध्ये हे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात.
दहिपळस वृक्षाची पाने पळसाच्या पानासारखी आहेत. या वृक्षाच्या खोडामध्ये दूध ठेवले तर त्याचे रूपांतर तात्काळ दह्यामध्ये होते. यामुळे या वृक्षाला दही पळस असे म्हणतात. कर्करोग तसेच उच्च रक्तदाब अशा आजारांमध्ये दही पळस हे अतिशय गुणकारी औषध आहे. विदर्भात ग्रामीण भागात काही ठिकाणी ही झाडे आहेत. ही झाड अतिशय दुर्मिळ असून या झाडांचे संगोपन होणे काळाची गरज असल्याचे प्रा. डॉ. प्रवीण सरदार म्हणाले.
विषरोधक वृक्ष- वृक्षप्रेमी अनिल चौधरी म्हणाले, की दही पळस वृक्षाच्या खाली कधीही साप किंवा विंचू येत नाहीत. यामुळेच घनदाट जंगलात या झाडाखाली झोप लागली तरीही कुठलीही चिंता करायची नाही असे म्हटले जाते. नागाचे विष देखील दही पळसच्या मुळाद्वारे उतरविले जाते. विंचू चावला तरी देखील या झाडाची पाने खाल्ली की विंचवाचे विष उतरून जाते.
दारू पिणाऱ्या व्यक्तीला या झाडाची पाने सतत खाऊ घातली तर तो व्यक्ती कधीही दारूला स्पर्श करत नाही, असे म्हटले जाते. दारू पिऊन बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला या झाडाखाली आणून ठेवले तर तो शुद्धीवर येतो. इतके गुणकारी वैशिष्ट्य असणारे हे झाड आहे-वृक्षप्रेमी अनिल चौधरी
वृक्षांच्या पानांद्वारे व्हायचा पत्र व्यवहार- दही पळस या झाडाच्या पानावर टोकदार काडीने काही लिहिले तर काही वेळानंतर लिहिलेले अक्षर पानावर स्पष्ट उमटलेले दिसते. यामुळेच पूर्वी पत्रव्यवहारासाठी या झाडाच्या पानांचा वापर केला जायचा, अशी माहिती विविध वृक्षांची सखोल माहिती असणारे वृक्षप्रेमी अनिल चौधरी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितली. हेरगिरी करण्यासाठी देखील या पानावर संदेश लिहून पाठवला जायचा. केवळ पत्र लिहिण्यासाठीच नव्हे तर दही पळस या वृक्षाची पाने कर्करोगासारख्या भयंकर आजारावर रामबाण उपचार आहेत, असे देखील अनिल चौधरी म्हणाले.
वन विभागासह सर्वांनीच दही पळसाचे वृक्ष संवर्धित करण्याची अतिशय महत्त्वाची गरज आहे- प्रा. डॉ. प्रवीण सरदार
दहीपळस संवर्धनाची गरज- अमरावती शहरात चांदूर रेल्वे मार्गावर असणाऱ्या दही पळसाच्या वृक्षावर पोपट, कावळे ,चिमण्या यासह विविध पक्षी नेहमीच असतात. या वृक्षाला एप्रिल आणि मे महिन्यात बहर येतो. वडाच्या झाडाप्रमाणेच पक्षी या वृक्षाच्या बिया खाऊन विष्ठा करतात त्याच ठिकाणी हे झाड उगवू शकते. मात्र सध्या स्थितीत या वृक्षांची संख्या नगण्य अशीच आहे.
हेही वाचा-
- Bahava Tree in Melghat : मेळघाटच्या उन्हात बहरला 'बहावा'; पिवळी फुले खेचताहेत नागरिकांचे लक्ष
- West Vidarbha Mango: उत्तर प्रदेशातील दशहरी रुजला विदर्भात; रायवळ सोबतच मेळघाटातील आंबीन आंब्याची चवच न्यारी
- Shami Plant Significance: 'शमी'साठीच झाले पहिले चिपको आंदोलन; 'या' झाडाचे आहे धार्मिक, सांस्कृतिक आणि आयुर्वेदिक महत्त्व