अमरावती - मागील अनेक दिवसांपासून विदर्भामध्ये पावसाने दडी मारली होती. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला होता. अनेक ठिकाणी तर दुबार पेरणीचे संकट आले होते. दरम्यान तीन दिवसांपासून विदर्भात पाऊस सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. अमरावती जिल्ह्यातही शनिवारी अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे दर्यापूर तालुक्यातील थिलोरी गावात पावसाचे पाणी शिरले होते. तर काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याने भिंती पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा संसार आता पुन्हा उघड्यावर आला आहेत. अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
मागील वर्षीही घडली होती अशी घटना -
मागील वर्षी जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पावसाने थिलोरी गावानजीक असल्याने नाल्याला पूर आला होता. अर्ध्यापेक्षा जास्त गावाला पुराने विळखा घातला होता. त्यामुळे जवळपास १८८ कुटुंबाच्या घरात पाणी शिरले होते. तर अनेकांच्या घराच्या भिंती देखील कोसळल्या संसार उघड्यावर आले होते.
थिलोरी येथे भिंत कोसळली -
दर्यापूर तालुक्यात थिलोरी गावात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी विनायक टापरे हे यांनी पत्नी व मुलासह घरात झोपले होते. घराची भिंत कोसळत असल्याचे दिसताच ते घरातून बाहेर पडले. भिंत कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणाचीही जीवित हानी झाली नाही. घरकुल योजना मिळण्यासाठी ग्रामपंचायतला पंधरा वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. परंतु, अद्यापही घरकुल योजनेचा लाभ मला दाखला मिळाला नाही. असा आरोप विनायक टापरे यांनी केला आहे. घरातील अन्नधान्य सुद्धा या पावसामुळे भिजले असल्याचे त्यांनी सांगितले.