अमरावती - हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी विदर्भात मान्सून वेळेवर दाखल झाला. शेतकर्यांनी पेरणीही केली. पीक जोमात वाढीला लागल. अशातच काल सायंकाळी अमरावतीच्या चांदुर रेल्वे तालुक्यात पाऊस धो-धो बरसला आणि त्यात बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा समोर आला. त्यामुळेच या तालुक्यातील सातेफळ परिसरातील अनेक शेतकऱ्यांची अनेक एकर शेतजमीन पार खरडून गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला असून या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
दुबार पेरणीचे संकट
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ गावाच्या परिसरात पाऊस बरसला आणि क्षणार्धात या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे नुकसान झाले. एकीकडे आलेला पाऊस त्यात बांधकाम विभागाची असलेली चुकी या दोन गोष्टींमुळे त्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आणि सुपीक जमीन क्षणार्धात खराब झाली. ही परिस्थिती एकट्या शेतकऱ्याची नसून या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे कुणाची सोयाबीन, कोणाची तूर तर कपाशी या पावसामुळे वाहून गेली आहे. त्यामुळे आता दुबार पेरणीचे संकट या शेतकऱ्यांवर उभे ठाकले आहे.
नुकसानीचा पंचनामा
आधीच बियाण्यांच्या वाढलेल्या किंमती, खतांचे वाढलेले भाव यामुळे शेतकरी संकटात असताना आता दुबार पेरणीला लागणाऱ्या पैशांसाठी कोणासमोर हात पसरावे, अशी चिंता या शेतकर्यांसमोर आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी, अशी मागणी आता या शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा प्रशासन करत आहे, अशी माहिती तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिली.