अमरावती - अमरावती जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईचा सपाटा सुरूच आहे. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील गौरखेडा आणि तरोडा याठिकाणी गावठी दारूवर छापा टाकण्यात आला. यात 2 लाख 94 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चांदूर रेल्वे पोलिसांनी केली.
चांदूर रेल्वे तालुक्यातीव गौरखेड व तरोडा परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळल्या जात होती, अशी माहिती चांदूर रेल्वे पोलीसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी याठिकाणी छापा टाकत ९० ड्रम मोह सडवा आणि गावठी दारू असा एकूण २ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे. यात आरोपी गिरीष पवार, मनोज पवार, लोकेश पवार हे तीन आरोपी फरार आहेत.
हेही वाचा - कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच; सरकारची कबुली
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि १ आर.सी.पी. पथक यांचा समावेश होता. बऱ्याच वर्षानंतर चांदूर रेल्वे तालुक्यात एवढी मोठी दारूवर कारवाई करण्यात आली आहे.