अमरावती - उन्हाळ्यात 48 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान. पाण्याचा दूरपर्यंत थेंब नाही आणि चारा ही कुठे मिळेना. अशा परिस्थितीत आपल्या उंटांसाठी पाणी आणि शेळीसाठी चारा हवा म्हणूंन गुजरातच्या कच्छ प्रांतातील अनेक कुटुंब विदर्भात येतात. अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी उंटांसह आलेले गुजराती, राजस्थानी पेहरावातील अनेक कुटुंब दृष्टीस पडतात. आपल्या घरापासून हजारो किलोमीटर लांब हे लोकं केवळ आपल्या उंटांना पाणी मिळावे आणि शेळींना चारा उपलब्ध व्हावा यासाठीच येतील शेतकऱ्यांच्या शेतात राहुटी टाकतात आणि आपल्या गावाला पाऊस पडेल याची प्रतीक्षा करतात. तसेच तोपर्यंत इकडेच मुक्काम ठोकतात.
वायगावं परिसरात दरवर्षी येतात रबारी कुटुंब
अमरावती शहरापासून 30 की.,मी अंतरावर असणाऱ्या वायगावं परिसरात गुजरातच्या कच्छ प्रांतातील रबारी कुटुंब दरवर्षी आपले उंट आणि शेळ्या घेऊन येतात. जवळपास 35 ते 40 वर्षांपासून आम्ही या भागात येतो, असे देवा रबारी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
यावर्षी कोरोना असल्याने मुलांच्या शाळा बंद होत्या, म्हणून पहिल्यांदाच तीन लहान मुलांना सोबत आणले. या ठिकाणी इंगोले यांच्या शेतात आम्ही झोपडी उभारली आहे. सोबत दोन उंट आणि 60 शेळ्या आहेत. आमचं सर्व सामान आम्ही दोन उंटांवर ठेऊन आणले आहे. दरवर्षी येतो म्हणून हा भाग आमच्या ओळखीचा आहे. चार दिवस या शेतात मग चार दिवस दुसऱ्या शेतात थांबून आम्ही दिवस काढतो, असेही देवा रबारी यांनी सांगितले.
![amravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-amr-02-video-for-migration-from-kachcha-to-vidarbha-vis-7205575_10032021183114_1003f_1615381274_110.jpg)
हेही वाचा - ६० ते ८०च्या दशकातील दुचाकींचा संग्रह असणारा कर्नाटकातील 'सिव्हिल इंजिनिअर'
गरज पडली की गावी जाऊन परत येतो
कच्छच्या गांधीधम जिल्ह्यातील रहिवासी असणारे रबारी कुटुंब अमरावतीत आले असले तरी यांचा समाज हा रबारी या नावानेच ओळखला जातो. राजस्थानच्या मारवाड आणि गुजरातच्या कच्छमध्ये हा समाज मोठ्या संख्येने वास्तव्याला असून, उंट पाळणे हाच यांचा मुख्य व्यवसाय आहे. सध्या वायगाव परिसरात देवा रबारी, त्यांचे वडील मांगा रबारी यांच्यासह लगतच्या शेतात त्यांचे जावई गोकर रबारी वास्तव्यास आहेत. शेळीचे केस कापून विकणे हा सुद्धा या लोकांचा व्यवसाय असून, इकडे पैशाची चणचण भासली तर शेळीच्या अंगावरचे केस कापुन ट्रेनने गावाकडे जाऊन पैसे घेऊन चार दिवसात परत येतो, अशी माहितीही देवा रबारी यांनी दिली.
हेही वाचा - युती सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती जाहीर
वायगाव परिसरात मुबलक पाणी
अमरावती- परतवाडा मार्गावर उजव्या हाताला वायगवला जाताना विश्रोळी धरणातून आलेले पाणी अनेक ठिकाणी पाईप फुटल्याने वाहत आहे. त्यामुळे उंट आणि शेळी घेऊन आलेल्या वाळवंटातील लोकांसाठी ही मोठी लॉटरी आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य असून, कपडे धुण्यासाठीही रबारी कुटुंब या पाण्याचा वापर करत आहे. मुबलक पाणी या परिसरात सहज उपलब्ध होत असल्याने या भागात राहण्यास अडचण येत नाही. गावातील दुकानदार इतर व्यावसायिक आता परिचयाचे झाले असल्याने व्यवहार करणेही अडचणीचे नाही, असे देवा रबारी यांनी सांगितले.
![amravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-amr-02-video-for-migration-from-kachcha-to-vidarbha-vis-7205575_10032021183114_1003f_1615381274_600.jpg)
शेतकऱ्यांना मिळते खत
शेतात राहण्यासाठी परवानगी दिली म्हणून शेतकरी या लोकांना पैस मागत नाही आणि आमच्या जनावरांमुळे खत मिळते म्हणून हे लोकंही पैसे मागत नसल्याने याठिकाणी आर्थिक व्यवहारातल्या कुठल्याही अडचणी नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी खत उपलब्ध होत असल्याने आपल्या शेतात उंट आणि शेळी घेऊन येणाऱ्या या मंडळींचे शेतकऱ्यांकडून सदैव स्वागतच होते.
हेही वाचा - मुंबईत पुन्हा धावणार १२ इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया, या ठिकाणी असेल थांबा