अमरावती - सात वर्षांची किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 45 दिवसांचा इमर्जन्सी पॅरोल मंजूर केला जात आहे. या अनुषंगाने गेल्या पाच दिवसात गृह विभागाच्या निर्देशानुसार अमरावती मध्यवर्ती कारागृहातून ९६ कैद्यांना बॉण्डवर सोडण्यात आले आहे.
तुरुंगातील कैद्यांनादेखील कोरोनाची लागण होत असल्याने राज्याच्या गृह विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे समिती गठीत करण्यात आली आहे. ज्या कैद्यांना सात वर्षाची अथवा त्यापेक्षा कमी शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि ज्यांचे कारागृहात वर्तन चांगले आहे, तसेच जे सुधारण्याच्या मार्गावर आहेत, अशा बंदी जणांना कारागृहातून इमर्जन्सी पॅरोल मंजूर केला जात आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. सर्व कैदी कारागृहात एकत्र राहत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ८ मे रोजी आदेश देताच ९ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. रविवारपासून अमरावतीतील कारागृहातील कैद्यांना शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पाच दिवसात तब्बल ९६ जणांना सोडण्यात आले आहे.