अमरावती - गेल्या दोन-तीन दिवसांत राज्यातील काही भागात पावासाच्या सरी बरसल्या. मात्र, अमरावतीमध्ये उकाडा कायम होता. आज दुपारच्या सुमारास मान्सूनपूर्व पावासाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. तसेच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
आज बुधवारी कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकले. त्यामुळे जवळपास संपूर्ण राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास ग्रामीण भागात पाऊस पडला. त्यामुळे पाच ते सहा दिवसांपासून होत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.