अमरावती - जिल्ह्यातील धारणीमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी छापेमारी करत अवैध गुटखा जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईत तब्बल पावणेसात लाखांचा गुटखा व सुगंधित तंबाखु जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एका ट्रक मालकासह तीन व्यावसायिकांना ताब्यात घेण्यात आले.
खबऱ्याकडून मिळाली माहिती-
धारणीमध्ये बंदी असलेल्या गुटख्याची विक्रीसाठी अवैधरित्या साठवणूक केल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार पोलिसांच्या विशेष पथकाने ठिकठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद शरिफ अब्दुल हबीब कच्छी, लीलाधर मालवी यांच्याकडून १ लाख ९४ हजार ७२९ रुपये, तर राणीतंबोली येथील हुकूमचंद राजाराम मालवीय यांच्याकडून ८२ लाख १८९ असा एकूण ६ लाख ६० हजार ९०४ रुपयांचा साठा जप्त केला.
ही कारवाई आयपीएस अधिकारी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून या कारवाईने धारणीमध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे. राज्यात गुटखा विक्रीला बंदी आहे. मात्र, अवैधरित्या गुटखा तस्करी करून गुटखा विक्री केली जाते. अशा प्रकारच्या व्यावसायावर पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे.