अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधील अभियांत्रिकी शाखेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार २७ मे'ला समोर आला होता. ही प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या २ जणांना आज फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली. मात्र, या प्रकरणातील सूत्रधार अद्यापही फरार असून पोलीस त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आशिष श्रीराम राऊत (२८, रा. बोर्डी, अकोला) आणि निखिल अशोक फाटे (२७ रा. गाडगेनगर अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाशिम येथील संमती महाविद्यालयातील कर्मचारी ज्ञानेश्वर बोरे अद्यापही फरार आहे. विद्यापीठाच्या परीक्षेत अभियांत्रिकी विषयाची प्रश्नपत्रिका तासभरापूर्वी विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर आली होती. विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी या प्रकरणात आधी स्वतः तपास करून याबाबत कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांना माहिती दिली. कुलगुरूंनी या प्रकरणात चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यावर देशमुख यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलीस निरीक्षक ए. एच. चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू लवटकर यांनी आशिष राऊतला अकोट येथून ताब्यात घेतले आणि निखिल फाटे याला गाडगेनगर येथून अटक केली. या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
काय आहे प्रकरण -
अभियांत्रिकी शाखेचा मॅकेनिक्स विषयाचा २७ मे'ला सकाळी ९ वाजता होता. मात्र, त्याचदिवशी सकाळी सुमारे सव्वाआठ वाजता विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली होती. ही प्रश्नपत्रिका वाशिम येथील संमती महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरून डाऊनलोड झाल्याचे समोर आले होते.