अमरावती- वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा मात्र महिलांनी पूजा करण्यासाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अमरावती शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यावेळच्या पौर्णिमेला महिलांनी घराबाहेर पडू नये. घरातच पूजा करावी, असे आवाहन अमरावती पोलिसांनी केले आहे.
अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 263 वर पोहोचली असून शहरातील जवळपास सर्वच भाग कोरोनाने व्यापला आहे. अशा परिस्थितीत वडाच्या पूजेसाठी घराबाहेर पडून महिलांनी गर्दी करणे धोकादायक आहे. त्यामुळे महिलांनी यावर्षी वडाच्या झाडाची पूजा करण्यास घराबाहेर पडू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.