अमरावती - लोकशाहीत एका मतालाही अतिशय किंमत असते, असे म्हटले जाते. मात्र 350 लोकसंख्या असलेल्या अमरावतीच्या सोनेरा काकडे गावातील ग्रामस्थांनी, आमच्या गावची लोकसंख्या कमी म्हणून आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, अशी खंत व्यक्त केली आहे. इतक्या वर्षांनंतरही विकासापासून वंचित असलेल्या या गावकऱ्यांनी अखेर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
गावात रस्ता नाही, हमरस्त्यापासूनही गाव दुर
अमरावतीतील सोनेरा काकडे या गावची लोकसंख्या ३५० इतकी आहे. गट ग्रामपंचायतीला जोडले असल्याने या गावात ग्रामपंचायत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे जाण्यासाठी येथील गावकऱ्यांना ३ किलोमीटर अंतर पार करत जावं लागतं. मात्र मागील १७ वर्षांपासून या रस्त्याचे काम न झाल्यामुळे या लोकांचे रस्त्याअभावी हाल होत आहेत.
हेही वाचा... बडनेरा मतदारसंघात भारत गणेशपुरे विरुद्ध बिग बॉस शिव ठाकरे!
गावात पिण्याच्या पाण्याची समस्या
पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी पायपीठ, हे येथील महिलांचे रोजचे काम बनले आहे. मात्र गावातील रस्त्यावर देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच इतक्या वर्षांत गावात पाण्याची एका टाकी न झाल्याने येथील महिलांना रोज त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा... मुख्यमंत्र्यांनी बडनेऱ्यात सभा घेऊन माझ्या विरोधात बोलून दाखवावे - आमदार रवी राणा
इतक्या वर्षांनंतरही समस्या कायम, अखेर मतदानावर बहिष्काराचा निर्णय
रस्त्याची समस्या, पाण्याची समस्या, आरोग्याच्या सुविधेचा अभाव या येथील प्रमुख समस्या आहेत. हातपंपाला पिण्याचे पाणी सुद्धा खराब येत असल्याची तक्रार येथील गावकरी करत आहेत. या संदर्भात अनेकदा ग्रामपंचायतकडे विनंती केली, लोकप्रतिनिधीला सांगितले तरी सुद्धा गावाकडे कोणी फिरकलेच नाही, अशी येथील ग्रामस्थांची तक्रार आहे. यामुळेच सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत येत्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा आशयाचे पत्र त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिले आहे. त्यामुळे आता समस्यांनी गांजलेल्या अमरावती जिल्ह्यातील सोनेरा काकडे या गावातील निर्णयाचा आणि समस्यांचा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी किती गंभिर्याने विचार करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा... अमरावतीच्या धामणगाव मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रताप अडसड अडचणीत