अमरावती - विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडण्यपूर येथून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुख्मिणी संस्थेची पालखी वारकरी पंढरपूरला घेवून गेले आहेत. सन 1594 पासून सुरू झालेल्या पालखीचे यावर्षीचे हे 425 वे वर्ष असून महाराष्ट्रातील ही पहिलीच इतकी जुनी पालखी आहे.
विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरची ओळख आहे. कौंडण्यपूरला कृष्णाची पत्नी रुख्मिणीचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. वर्धा नदीच्या तीरी वसलेले कौंडण्यपूर हे तिवसा तालुक्यात असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे भेट देण्यास येतात.
कौंडण्यापूरला दरवर्षी 10 दिवसांचा कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सव भरत असतो. पंढरपूरनंतर महाराष्ट्रातील विठ्ठलाचे हे दुसरे ठिकाण असून कार्तिक पौर्णिमेला दीड दिवसासाठी विठ्ठल येथे येतो अशी लोकांची श्रद्धा आहे. यानिमीत्त कार्तिकी पौर्णिमेला तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथे रिंगन सोहळा आयोजित केला जातो. विदर्भातील व पश्चिम महाराष्ट्रातील पालख्या रिंगण घेऊन कौडण्यपूरला येतात. रुख्मिणीच्या पालखीचे यावर्षी 425 वे वर्ष आहे. ही पालखी सन 1594 पासून निघत असून महाराष्ट्रातील ही पहिलीच एवढी जुनी पालखी आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येत्या 12 तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविक कौंडण्यापुरात दर्शनासाठी येणार आहेत.