अमरावती - कोरोनामुळे ओढावलेल्या संकटाला मात देण्यासाठी अमरावती शहरातील इर्विन जिल्हा सामान्य रुग्णालयात चीनच्या हर्मन्स केमो मैफ कंपनीचा ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या जागेची आज बडनेरचे आमदार रवी राणा यांनी पाहणी केली.
चीनमधून आयात केला आहे ऑक्सिजन प्रकल्प -
खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नामुळे आणि हर्मन्स केमो मैफ कंपनीच्या सीएसआर फंडमधून देण्यात आलेल्या निधीतून हा ऑक्सिजन प्रकल्प अमरावतीत उभारला जात आहे. हा संपूर्ण प्रकल्प चीनमधून भारतात येण्यासाठी निघाला असून 10 जूनला हे सर्व साहित्य अमरावतीत पोचणार आहे. तसेच 20 जूनपर्यंत हा प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली. या प्रकल्पाद्वारे रोज 240 सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांची मदत -
खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नाने अमरावतीत लागणारा ऑक्सिजन प्रकल्प चीनमधून भारतात आणण्यासाठी केंडेकडून परवानगी मिळवून देण्यात देवेंद्र फडणवीस यांनी मदत केल्याचे आमदार रवी राणा म्हणले.
असा आहे ऑक्सिजन प्रकल्प -
हा ऑक्सिजन प्रकल्प एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवता येणार आहे. इर्विन हॉस्पिटलमधून या प्रकल्पाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविता येऊ शकतो. तसेच ग्रामीण भागात किंव्हा मेळघाटातील धारणी, चिखलदरा तालुक्यातही नेता येऊ शकतो, असे आमदार रवी राणा यांनी सांगितले.