अमरावती - पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शनिवारी शहीद सन्मान यात्रा काढली. यावेळी रॅलीत ५० फुटांचा अखंड तिरंगा घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
सकाळी १० वाजता दसरा मैदान येथून शहीद सन्मान रॅलीला सुरुवात झाली. श्री समर्थ विद्यालय, राजपेठ येथून निघालेल्या या रॅलीचा समारोप राजकमल चौक येथे झाला. रॅलीदरम्यान भारत माता की जय, अशा घोषणा देण्यात आल्या. राजकमल चौक येथे कारगिल युद्धात सहभागी झालेले सेवानिवृत्त सैन्य अधिकारी रमेश ताराळ यांच्या अध्यक्षतेखाली वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस प्राध्यापक स्वप्निल पोतदार, ज्ञानेश्वर खुपसे यांच्यासह शेकडो विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.