अमरावती - संत्रा पिकाला बहर येऊन फळे लागली आहेत. मात्र, रोगाच्या प्रादुर्भवामुळे झाडावर असणारी संत्री सडत आहे. यामुळे भातकुली तालुक्यातील काही भागात संत्रा बागायतदार हवालदिल झाले आहेत. एकाचवेळी अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
भातकुली तालुक्यातील आऱ्हाड-कुऱ्हाड गावालगत अनेक बागांमध्ये बहरलेला संत्रा झाडावरच सडून खाली गळत आहे. बागायतदार या संकटावर मात करण्यासाठी सर्व प्रकारच्या औषधींची फवारणी करत असून या फवारणीचा कुठलाही सकारात्मक परिणाम होताना दिसत नाही. अशी माहिती संत्रा उत्पादक शेतकरी प्रकाश डकरे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
फळमाशीसह संत्र्यावर बुरशी आणि पायथोफोरा यामुळेही संत्री खराब होत आहे. झाडावरच सडणारी संत्री चिकट होऊन खाली पडत आहे. खाली पडल्यानंतर त्यांचा रंग चिकूसारखा होतो. भातकुली तालुक्यातील अनेक बागांमध्ये सडलेल्या संत्रीचा सडा पडला असून यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.