अमरावती - विदर्भातील संत्रा अर्थात नागपुरी संत्री असं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांना या भागातील संत्रा फळाबद्दल आकर्षक वाटते. परंतु ही संत्री पिकवणारा शेतकरी मात्र सलग चौथ्या वर्षी मेटाकुटीला आला आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे संत्रा बागांना लागलेली गळती. मागील दोन महिन्यांपासून अति पावसामुळे विदर्भातील नागपूर, अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हलाकीच्या परिस्थितीमध्ये सापडला आहे. सुरुवातीला हजारो संत्रा फळांनी बहरलेल्या संत्रा झाडावर मात्र आता निम्या पेक्षाही कमी संत्री शिल्लक नाही. त्यात शेतात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांची परिस्थिती बिकट असल्याने कुठलेच वाहन संत्रा बागापर्यत जात नाही. त्यामुळे व्यापारीही शेताकडे फिरकत नाही. मग संत्रा कोण खरेदी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर संत्रा बागा पूर्ण खाली येण्याला उशीर लागणार नाही.
संत्रा गळीतीचे हे आहेत कारण
मागील चार वर्षापासून संत्रा बागांना पाऊस हा क्षमतेपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे संत्राचे देठ सुकण्याचे प्रमाण वाढले आहे. बुरशीमुळे फंगस देखील वाढले आहेत. त्यात संत्राचे दिवस पूर्ण झाल्याने बुरशी वाढली आहे. त्यामुळे गळती वाढली आहे. संत्राची मोठ्या प्रमाणावर होत असलेली गळती थांबवण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हजारो रुपयांची महागडी फवारणी केली. पण गळत मात्र थांबली नसल्याचे संत्रा उत्पादक शेतकरी दिवाकर ठोंबरे यांनी सांगितले.
सुरवातीला झाडावर 20 कॅरेट संत्रा होते -
संत्रा फुटायला सुरुवात झाली तेव्हा जवळपास एका झाडावर वीस कॅरेट संत्री होती. परंतु आता मात्र आठ कॅरेट सुद्धा संत्री शिल्लक नाही. दरवर्षी दसरा सणापर्यंत संत्रा उत्पादक शेतकरी आपल्या संत्र्याच्या बागा विकून मोकळी होत असतात. परंतु दसरा उलटून सुद्धा जिल्ह्यातील हजारो संत्रा बागा विकायचा बाकी आहे.
संत्राचे भावही कोसळले -
सुरुवातीला तीस ते पस्तीस रुपये किलो संत्रा विकत होता. परंतु आता दहा ते बारा रुपये किलोपर्यंत संत्रा व्यापारी मागत आहे. जो बगीच्या पाच लाख रुपयांचा होता तो आता एक लाख रुपयाला, व्यापारी मागत असल्याचा संत्रा उत्पादक शेतकरी सांगतात.
या तालुक्यात नुकसान -
संत्रा गळतीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर, नरखेड तर अमरावती जिल्ह्यातील वरूड, मोर्शी, तळेगाव, चांदूरबाजार या तालुक्यांमध्ये मोठा प्रभाव दिसत आहे. शेतकरी महागडी औषधे वापरत असला तरी याचा काहीएक फायदा होत नाही. परिणामी आर्थिक खर्चात वाढ आणि उत्पन्न कमी अशा अवस्थेत शेतकरी अडकला आहे. तर शासनाकडून अजूनही ठोस मदत मिळाली नाही.
१ लाख रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई द्या -
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेल्या संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. सद्या मात्र या वर्षात अंबिया बहाराला गळती आल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. अमरावती जिल्ह्यात संत्राची मोठ्या प्रमाणावर गळण होत आहे. दरम्यान चांदुरबाजार तालुक्यातील संत्रा बागाची पाहणी माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी करत संत्राला प्रति हेक्टर १ लाख रुपये हेक्टर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच भाजपा नेते अनिल बोंडे यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील संत्रा गळत होत असल्याने बच्चू कडू यांनी दखल घ्यावी अशी मागणी देखील केली आहे.