अमरावती - विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेला अमरावतीतील संत्रा उत्पादक शेतकरी हा पुन्हा एकदा घोर संकटात सापडला आहे. उन्हाळ्यामध्ये विदर्भात पाण्याचा दुष्काळाने पोटच्या लेकराप्रमाणे जगवलेल्या संत्रा झाडाचे नुकसान झाले. त्यात आता परतीच्या पावसाने कहर केला आहे. मागील 8 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने संत्रा पिकाला ग्रासले आहे.
या संत्र्याची आंबट गोड चवीसाठी ओळख आहे. संत्राला विदर्भासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठी मागणी आहे. मात्र, संत्रा उत्पादकावर मोठे संकट आले आहे. अमरावतीतील मोर्शी, वरुड, चांदुर बाजार, तिवसा, धामणगाव रेल्वे येथील संत्राच्या बागांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
हेही वाचा - दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची दुकानात गर्दी; धनत्रयोदशीला मात्र सराफा बाजाराकडे पाठ
सध्या संत्रा पिकावर परतीच्या पावसामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. येथील उमेश झिबळ नावाच्या शेतकऱ्याने याबाबत त्याची व्यथा सांगितली. ४ एकर शेती असताना ४५० संत्राची लागवडीत मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे कवलीमोल भावात संत्रा विकावा लागतो आहे. तसेच लागवडीसाठी लागलेला खर्चही निघणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, झाडावर होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रात्री शेतात सोलर ट्रॅप लावायचा सल्ला कृषी अधिकारी अजय तळेगावकरी यांनी दिला आहे. तसेच याबाबतीत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कार्यकर्त्यांसह उमेदवारांची गोची
या परिस्थितीत त्वरित सर्वेक्षण करून सरकारी मदतीची शेतकऱ्यांना गरज असताना सरकार सत्तेची गणिते जुळवण्यातच व्यस्त आहे. तर, सरकार या परिस्थितीबाबत काय निर्णय घेते याकडे शेतकरी लक्ष लावून बसला आहे.