अमरावती - जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे आंबिया बहाराचे संत्री झाडाखाली गळून पडत आहे. दरोरोज हजारो संत्र्याचा सडा जमिनीवर पडून मातीमोल होत आहे. निसर्गाच्या प्रकोपोमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जात आहे. राज्याचे कृषी मंत्री असलेल्या डॉ अनिल बोंडे यांच्या जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी पुरता हवालदील झाला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. संत्रा पिकाला बाजारभाव नाही आणि चांगली बाजारपेठेही नाही. कर्ज काढून पिकवलेल्या संत्र्याला गळती सुरू झाली आहे. पण, कृषी विभागाचे अधिकारी मात्र फिरकलेच नाहीत. असा आरोप शेतकरी करत आहे.