अमरावती - अचलपूर मतदारसंघात येणाऱ्या भंडाराज मंडळ येथील संत्री आणि लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी विम्याच्या रकमेचा योग्य मोबदला न मिळाल्याची तक्रार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली आहे. यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
संत्री आणि लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी 2018-19 या हंगामात बजाज आलियांज या कंपनीचा विमा काढला होता. संबंधित कंपनीने भंडाराज मंडळमधील संत्री उत्पादकांना 11 हजार 700 रुपये प्रतिहेक्टर रक्कम दिली होती. मात्र, लगतच्या सातेगाव मंडळात मात्र याच कंपनीने शेतकऱ्यांना 38 हजार 500 रुपये विम्याची रक्कम दिल्याने शेतकऱ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे. यासाठी भंडाराज मंडळ येथील शेतकरी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शैलेश नवाल यांना भेटले.
बजाज कंपनीकडून वाढीव मोबदला मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
लिंबू हे फळ असतानाही त्याचा समावेश फळ वर्गीय पिकांमध्ये केला नसल्याने नुकसान भरपाई न मिळाल्याचा आरोप उत्पादकांनी केला आहे. तसेच शासनाने लिंबाचा फळ वर्गीय पिकात समावेश करावा, अशी मागणी यावेळी लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी केली.