अमरावती - मेळघाटातील दूषित पाणी बाधा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार राजकुमार पटेल यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत तात्काळ जाहीर करत असल्याचे सांगितले. माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चूभाऊ कडू यांनीही या कुटुंबांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत ‘प्रहार’च्या वतीने जाहीर केली आहे.
प्रहार पक्षाची प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत - चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम पाचडोंगरी व कोयलारी गावांमधील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्याने व पिण्यासाठी पाणी उपलब्ध न झाल्याने नाइलाजाने स्थानिक नागरिकांना वापरात नसलेल्या विहिरीचे पाणी पिण्याची वेळ आली. त्यामुळे तिथे अतिसाराची साथ पसरली. या घटनेची माहिती मिळताच आमदार बच्चू कडू व पटेल यांनी तत्काळ जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना माहिती देऊन ताबडतोब उपचार व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख मदत जाहीर केली. त्याचप्रमाणे, प्रहार पक्षाच्या वतीने प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
आमदारांकडून पूरस्थितीचा आढावा - आमदार पटेल यांनी पाचडोंगरी व कोयलारी गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या परिसरात साथ रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.