अमरावती: श्रमसाफल्य अभियंता क्रीडांगण विकास समिती व क्रिकेट अकॅडमीद्वारे आयोजित रात्र कालीन कोस्को टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे स्पर्धा तसेच श्रम साफल्य अभियंता क्रीडांगणाच्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा व एक तास मोबाईल नको, या संकल्पनेचा शुभारंभ यावेळी होणार आहे. आज विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात जीवन गतिमान झाले आहे. मोबाईलने आपले जीवन गतिमान जरी केले आहे. मोबाईलच्या अतिरिक्त व अवास्तव वापरामुळे आपण शारीरिक क्षमता कमी करत आहोत. मोबाईल संस्कृतीमध्ये आपण इतके गुरफटले गेलो आहोत, की एकमेकांमधील संवाद हरपला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे नातेसुद्धा दुरावत चालले आहे. तसेच विद्यार्थी मैदानी खेळापासून दूर जात आहे. त्याचा शारीरिक आरोग्यावर सुद्धा परिणाम दिसून येत आहे. हे असेच चित्र राहिल्यास आपले स्वतःवर दुर्लक्ष होईल. आपले आयुष्यच मोबाईलच्या विळख्यात हरवून जाईल.
एक तास मोबाईल व्यतिरिक्त: यापासून आजच्या पिढीला परावृत्त करून किमान एक तास तरी आपल्या स्वतःसाठी द्यावा, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन संकल्पना रुजवण्यासाठी 'वन अवर मोबाईल नेव्हर' म्हणजे एक तास मोबाईल व्यतिरिक्त. या संकल्पनेचा नक्की फायदा होईल. तसेच आपल्याला आरोग्याकडे लक्ष देता येईल. आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात आपण क्रीडांगणावर घेऊन जाऊन त्यांच्या शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांनी व्यक्त केला.
मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थी खेळापासून दूर: अमरावती शहर हे सांस्कृतिक आणि क्रीडासाठी प्रसिद्ध आहे. परंतु मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थी मैदानापासून दूर गेले आहेत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक जडणघडणीसाठी विद्यार्थ्यांनी खेळणे गरजेचे आहे. त्यामुळेच प्रशांत डवरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'वन अवर मोबाईल नेव्हर' ही संकल्पना चांगली आहे, असे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन यांनी सांगितले.
कल्पकतेतून साकारली अभिनव प्रतिज्ञा: मोबाईल व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच काही गोष्टी करण्यासारख्या आहेत. कटुंब, शिक्षण, अभ्यास, मैदानी खेळ, मनोरंजन या बाबीसुद्धा जीवनात महत्वपूर्ण आहे. याकडे विद्यार्थी, पालक, तसेच नागरिकांचा कल वाढविण्यासाठी माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांनी कल्पकतेला कृतीची जोड देण्यासाठी अभिनव प्रतिज्ञा साकारली आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे. आगामी काळात शाळा, महाविद्यालय, विविध संस्था, मंडळे, वसतिगृह या ठिकाणी या प्रतिज्ञाचे वाचन होणार आहे.
अशी आहे प्रतिज्ञा: मोबाईल व्यतिरिक्त ही माझा परिवार आहे. परिवाराची जबाबदारी माझी आहे, व माझ्या परिवारावर माझे प्रेम आहे. माझे व माझ्या परिवाराचे आरोग्य व ज्ञान वाढविण्याचा माझा ध्यास आहे. तो ध्यास पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांच्या गुरुजनांच्या समोर मोबाईल खिश्यात ठेऊन त्यांचा मान राखेल, व तंत्रज्ञानाचा आविष्कार असणारा हा मोबाईल श्राप न ठरता वरदानच ठरवेल. दररोज एक तास मोबाईलपासून दूर राहण्याची मी प्रतिज्ञा करतो आहे.