अमरावती - जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील १०३ वर्ष जुनी तीन मजली इमारतीचा पुढील भाग आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास कोसळला. यामध्ये इमारतीमध्ये राहणारी एका वृद्धेचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सावित्रीबाई अग्रवाल, असे मृत महिलेचे नाव असून बिहारीलाल अग्रवाल, असे जखमीचे नाव आहे. ही इमारत बिहारीलाल यांची आहे. यामध्ये चार जण राहतात. दरम्यान, दोघेजण कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे सावित्रीबाई आणि बिहारीलाल हे दोघेच घरात होते. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या इमारतीचा पुढील भाग कोसळला. यामध्ये सावित्रीबाईचा मृत्यू झाला असून बिहारीलाल जखमी झाले. सध्या जेसीपीद्वारे मातीचे ढिगारे उपसण्याचे काम सुरू आहे.
या गावात शंभर वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या १२ हून अधिक इमारती आहेत. या इमारती कधीही कोसळू शकतील. त्यामुळे ग्रामपंचायतने त्याची दखल घेऊन उपाययोजना कराव्या यासाठी एका ग्रामपंचायत सदस्याने ग्रामपंचायत प्रशासनाला दोन महिन्यांपूर्वी पत्र दिले होते. मात्र, अद्याप कुठलाच निर्णय न झाल्याने अखेर आज ही दुर्दैवी घटना घडली. ग्रामपंचायतने वेळीच दखल घेतली असती, तर आज निष्पाप वृद्धेचा जीव गेला नसता, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.