अमरावती - सध्या विदर्भात उन्हाचा कडाका वाढत आहे. मात्र, या उन्हाने अमरावतीत कहरच केला आहे. उन्हामुळे तापलेल्या रस्त्यावर अंड फोडल्यास चक्क त्याचे ऑम्लेट बनत आहे.
आज (शुक्रवार) अमरावतीमध्ये दुपारच्या सुमारास उन्हाचा पारा हा ४५ अंशांवर पोहोचला आहे. असे असताना तापलेल्या सिमेंट रोडवर अंडे फोडल्यावर त्याचे ऑम्लेटसुद्धा तयार होऊ लागले आहे. मागील एका आठवड्यापासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असल्याची नोंद झाली आहे. या वाढत्या उन्हामुळे दुपारच्या सुमारास रस्तेही निर्मनुष्य होऊ दिसत आहेत.
आज या तापत्या उन्हात एका व्यक्तीने सिमेंट रोडवर अंड फोडून टाकले. अर्ध्या ते पाऊण तासात त्या अंड्याचे ऑम्लेट तयार झाले. हे पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले. भाजणाऱ्या उन्हामुळे नागरिक घरात राहणेच पसंत करत आहेत.
दरम्यान, उष्णतेपासून वाचण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी उन्हात घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.