अमरावती - जुलैमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी अमरावती जिल्ह्यासाठी 4 कोटी 71 लाख 98 हजार रूपयांचा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. याबाबत उर्वरित निधीही लवकरच मिळवून दिला जाईल. एकही बाधित व्यक्ती वंचित राहू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी येथील उपस्थित नागरिकांना दिली आहे.
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे पडझड झालेली घरे, झोपडी, गोठे, दुकानदार, टपरीधारक, कुक्कुटपालन शेड, शेतजमीन आदींच्या नुकसानासाठी बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून मदत वितरित करण्यात आला आहे. अतिवृष्टीनंतर पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वत: गावोगाव दौरे करून पंचनाम्याच्या प्रक्रियेबाबत गतिमान कार्यवाहीचे आदेश दिले होते व याबाबत शासनाकडेही पाठपुरावा केला. यानंतरही आवश्यक निधी मिळवून दिला जाईल. महाविकास आघाडी शासन शेतकरी बांधव व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
जिल्हाधिका-यांकडून तालुक्यांना निधी वितरणाचा आदेश जारी
जिल्हा प्रशासनाकडून निधीचे तालुकानिहाय वितरण करण्यात आले असून, त्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सर्व तहसीलदारांना जारी केला. सर्व संबंधितांना गतीने निधीचे वाटप करावेत. निधी वितरणानंतर रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी रकमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले आहेत.
अहवाल सादर करावा
नैसर्गिक आपत्तीत क्षतिग्रस्त घरे, मृत जनावरे, पूर्णत: नष्ट, अंशत: पडझड झालेली घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्यांसाठी अनुदान, शेतजमिनीच्या नुकसानीसाठी अर्थसाह्य आदींसाठी हे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. दरम्यान, निधी वितरण करताना तांत्रिक त्रुटी टाळाव्यात. बँकांनीही या बाबींची पूरेपूर काळजी घ्यावी. सर्व तालुक्यांमध्ये बाधितांना वेळेत मदतीचे वाटप व्हावे. त्याबाबत अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा - किसान मोर्चाचा राज्य सरकारला धसका, मुख्यमंत्र्यांनी बोलावली नुकसान भरपाईसाठी बैठक