अमरावती : खारपाणपट्ट्यातील पाणी गोड करण्याचा हा प्रकल्प यशस्वी झाला तर अमरावती, अकोला, बुलढाणा या संपूर्ण परिसराचा विकासात्मक कायापालट होईल. जर हा प्रकल्प यशस्वी होऊ शकला नाही तर या भागातील खाऱ्या पाण्याद्वारे या ठिकाणी झिंग्याची शेती करणे शेतकऱ्यांना सोयीचे होईल. खारे पाणी गोड करण्याचा प्रकल्प यशस्वी होतो का? हे ऑगस्ट महिन्यात स्पष्ट होईल. हा जर यशस्वी झाला तर या भागातील लोकप्रतिनिधींनी आणि महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी मदत करावी. हा प्रकल्प यशस्वी ठरला तर झिंग्याच्या उत्पादनासाठी शासनाने लक्ष द्यावे, असे देखील नितीन गडकरी म्हणाले.
झिंग्याच्या शेतीच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांचा प्रचंड विकास होईल.- नितीन गडकरी
894 गावांना होणार फायदा : भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांनी राज्यातील फार पानपट्टा परिसरात संपूर्ण अभ्यास केल्यावर या खारपाणपट्ट्यात गोड पाणी उपलब्ध होऊ शकते, असा निष्कर्ष काढला आहे. यातूनच त्यांनी बोराळा येथे त्यांनी हा प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास एकूण 894 गावांचा गोड़ पाण्याचा प्रश्न सुटेल. यापैकी अमरावती जिल्ह्यात 365 गावे आहेत. अकोला जिल्ह्यात 372 आणि बुलढाणा जिल्ह्यात 166 गावांचा समावेश असल्याची माहिती सुरेश खानापूरकर यांनी दिली.
'असे' होणार खारे पाणी गोड : या खारपाणपट्ट्यात जमिनीपासून पाच फूट काळी माती आहे. त्यानंतर 25 ते 30 फूट पिवळी माती लागते. त्यानंतर पंधरा ते वीस फुटाचा वाळूचा थर आहे आणि त्यानंतर पुन्हा पिवळी माती लागते. ही पिवळी माती पाणी घेत नाही आणि पाणी देतही नाही. थोडक्यात ही पिवळी माती सिमेंट पेक्षाही मजबूत असल्याची माहिती यावेळी सुरेश खानापूरकर यांनी दिली. यामुळे या परिसरात 500 ते 1000 फुटावर सहा कुपनलिका घेतल्या असून त्यांची खोली साठ फूट आहे. आलटून पालटून वाळूचे व पिवळ्या मातीचे थर आहेत, हे वाळूचे थर जलधारक आहेत, म्हणून या भागाला आपण मल्टी एकवीफर सिस्टीम असे म्हणतो. जमिनीपासून ह्या वाळूच्या पहिल्या थरात जर आपण प्रचंड प्रमाणात पावसाची गोड पाणी टाकू शकलो. तर ह्या भागाच्या 50 फुटाच्या खोलीवरच मुबलक प्रमाणात गोड पाणी उपलब्ध होऊ शकेल. सध्या ह्या वाळूचा थरात पूर्ण खारट पाणी आहे, ते सध्या बाहेर काढणे सुरू आहे. यामुळे गोड पाणी आत शिरायला आपल्याला जागा मिळेल हे खारट पाणी पूर्ण काढल्यानंतर जेव्हा बंधाऱ्यात पावसाचे गोड पाणी येईल, ते या खोलीच्या भागात जाईल आणि पाणी गोड व्हायला सुरुवात होईल, असे सुरेश खानापूरकर म्हणाले.
'असा' आहे बोराळ्याचा प्रकल्प : बोराळा गावात सरकारी गट नंबर 80 मध्ये एका नाल्यावर बंधारा बांधण्यात येत आहे. हे नाला धरून 85 मीटर बाय 85 मीटर बाय 13 मीटर असे एक मोठे शेततळे तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये नऊ कोटी चाळीस लाख लिटर पावसाचे गोड पाणी थांबणार आहे. या जमिनीपासून पहिल्या वाळूच्या थरातून अंदाजे तीन कोटी लिटर खारे पाणी बाहेर काढून फेकले जाईल, त्यामध्ये नऊ कोटी लिटर गोड पाणी बांधाऱ्यात थांबेल. तीन कोटी लिटर गोड पाणी वाळूच्या थरात जाईल, असे एकूण बारा कोटी लिटर गोड पाण्यावर 40 सेक्टर म्हणजेच 100 एकर जमीन बारमाही ओलिताखाली येईल. टिंबर सिंचनाचा प्रयोग केला तर 27 एकर जमिनीतील बारमाही गोड पाणी उपलब्ध होईल. केवळ एका बोराळाच्या प्रकल्पामुळे इतका मोठा परिणाम शक्य होईल, असे सुरेश खानापूरकर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
- Mumbai-Hyderabad Bullet Train : मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम लवकरच सुरु; अंतिम डीपीआर सादर
- Sanjay Raut : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून खासदार संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
- CM Eknath Shinde : विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही