अमरावती - लग्नामध्ये होणारा वारेमाप खर्च टाळून समाजपयोगी काम जिल्ह्यातील शेंदोळा खुर्द येथील निलेश व जया या नव वधू-वरांनी केले आहे. लग्नातील खर्च वाचवून विद्यार्थ्यांसाठी त्यांनी संगणक केंद्र उपलब्ध करून दिले आहे. नव्या युगातील विद्यार्थ्यांच्या अंगी संगणकीय ज्ञान रुजविण्यासाठी, विद्यार्थ्यांना दृकश्राव्य साधनांच्या माध्यमातून अधिक प्रभाविपणे शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याचा उपयोग व्हावा, हा त्यापाठीमागील हेतू आहे. सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने लग्नकार्यातील खर्च त्यांनी संगणक केंद्र सुरू करण्यावर केला.
साध्या पध्दतीने विवाह
कोरोना काळात अनेकांनी आपले मोठे लग्न सोहळेही उरकले. कोरोना प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून अद्याप लग्नामध्ये जास्त लोकांची उपस्थिती अमान्य आहे. मात्र, शेंदोळा खुर्द येथील निलेश सूर्यप्रकाश जवंजाळ आणि जया या नव दांपत्यांनी आदर्श विवाह करत गावातील विद्यार्थ्यांकरीता संगणक केंद्र उपलब्ध केले. त्यांच्या लग्न कार्याबाहेर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, बुद्ध, तुकडोजी महाराज यांच्यासह थोर महापुरुषांच्या विचारांचे फलक पाहायला मिळाले.
सात संगणक दिले गावाला भेट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे 'पे बॅक टू सोसायटी' या विचाराला खऱ्या अर्थाने आचरणात आणून आपल्या कमाईचा काही हिस्सा हा समाजासाठी दान करणे हे आपले कर्तव्य आहे. याच उद्देशाने निलेश व जया यांनी आपल्या मंगल परिणय दिनी गावातीलच समाज मंदिराची रंगरंगोटी करून याठिकाणी विद्यार्थ्यांकरिता सात संगणक उपलब्ध करूने दिले. यातून विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान गाव पातळीवर निशुल्क मिळणार आहे. गाव विकासाकरिता कौतुकास्पद उपक्रम राबविला त्यांच्या दान कार्याचे मोठे कौतुक होत आहे.
पालकमंत्री यशोमती ठाकुरांची उपस्थिती
यावेळी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, सिनेट सदस्य रवींद्र मुद्रे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून नव वर-वधूंना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.