अमरावती (मेळघाट)- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा मेळघाट दौऱ्यावर असताना त्यांनी मेळघाटाच्या अतिदुर्गम भागात असलेल्या धुळघाट रेल्वे स्टेशनची रात्रीच्यावेळी पाहणी केली. हा रेल्वेमार्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशला जोडलेला जुना ब्रिटिशकालीन मार्ग आहे. ही रेल्वे लाईन ब्रॉडगेज करण्यात येत असताना राजकीय अडचणीत हा मार्ग सापडला आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा रेल्वे मार्ग तयार केला जातोय. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास आदिवासी बाह्य लोकांशी संपर्क करू शकणार.
5 वर्षांपूर्वी ब्रॉडगेज करण्याच्या नावाखाली हा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला. तेव्हापासून या लोकांना धारणी,अकोट अकोला किंवा खंडवा या ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी साधन उपलब्ध नाही. पूर्वी जेथे 10 रुपयात काम व्हायचे आता तेथे छोट्या-छोट्या कामासाठी तालुका मुख्यालय धारणी जाण्यासाठी 200 रुपये खर्च करावा लागतो. दरम्यान आता हा रेल्वे मार्ग पुन्हा सुरू करून आदिवासींसाठी फायदाचा ठरणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.