अमरावती - नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा येथील ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, नांदगावचे तहसिलदार यांनी सदर यादीतील मतदारांची नावे नियमबाह्य वगळून दुसर्या यादीत समाविष्ट केली, असा आरोप करून याबाबतची तक्रार सरपंच श्रीकृष्ण सोळंके यांनी जिल्हाधिकारी व निवडणूक आयोग यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी तहसिलदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
वाघोडा येथील वार्ड प्रक्रिया सुद्धा नियमानुसार करण्यात आली नाही. मूळ प्रारूप मतदार यादीच्या आक्षेपानंतर तलाठी यांच्या अहवालानुसार सदर मतदार यादी बरोबर असून ‘जैसे-थे’ ठेवण्यात आली होती. असे असताना निवडणूक कार्यक्रमानुसार २४ फेब्रुवारी रोजी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. परंतु, तहसीलदार यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून तलाठी व सचिव यांच्याकडून मतदार यादीतील नावात फेरबदल करून पुन्हा नव्याने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. या संपूर्ण प्रकरणाच्या तक्रारीत उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे यांच्याकडून झालेल्या चौकशीत सदर मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे तलाठी व सचिव यांनी पुन्हा २६ फेब्रुवारी रोजी नव्याने मतदार यादी प्रसिद्ध केल्याचे दिसून आले. तेव्हा वाघोडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरणाची तक्रार करून तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
हेही वाचा - बापरे...! कोरोनामुळे बंदी असताना एसडीएफ शाळेने घेतली नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा
हेही वाचा - अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस